शेळगाव : अकरा महिन्यांपासून भरतोय शिक्षकाविना वर्ग

शेळगाव : अकरा महिन्यांपासून भरतोय शिक्षकाविना वर्ग

शेळगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गौतमेश्वरनगर (गोतोंडी, ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मागील 11 महिन्यांपासून शिक्षक गैरहजर असल्याने शिक्षकांविना वर्ग भरत आहेत. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. गैरहजर शिक्षक व इंदापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाविरोधात ग्रामस्थ व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालक व केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमेश्वरनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर एक शिक्षक व एक शिक्षिका कार्यरत आहेत. मात्र, जगन्नाथ थोरात हे शिक्षक 23 ऑगस्ट 2022 पासून गैरहजर आहेत.

त्यांच्या गैरहजेरीत शिक्षिका 11 महिन्यांपासून दोन्ही वर्ग सांभाळत आहेत. इंदापूरच्या गटशिक्षण अधिकार्‍यांना ग्रामस्थ व पालकांनी वेळोवेळी तक्रारी करून दुसरा शिक्षक देण्याची मागणी केली आहे. मात्र, गटशिक्षणाधिकार्‍यांनी 11 महिन्यांत ग्रामस्थ व पालकांना उडवाउडवीची उत्तर देऊन शिक्षक देण्याची टाळाटाळ केली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. संबंधित गैरहजर शिक्षक व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.

शाळेवर गैरहजर शिक्षक न दिल्याने गटशिक्षण अधिकार्‍यांविरोधात शनिवारी (दि.8) गोतोंडी येथे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ व पालकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा गोतोंडी ग्रामपंचायतचे सदस्य किशोर कांबळे व पालकांनी दिला आहे. संबंधित शिक्षकावर कारवाई करू नये म्हणून तालुक्यातील राजकीय नेते व एक शिक्षक संघटना संबंधित अधिकार्‍यांवर दबाव आणत असल्याचादेखील आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित शिक्षक 5 वर्षांत सतत गैरहजर असतात.

यापूर्वीही ते दारू पिऊन शाळेवर येतात म्हणून पालक व ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले होते. मात्र, तरीही त्याठिकाणी दुसरा शिक्षक दिला नाही. शिक्षण विभाग व गट शिक्षणाधिकार्‍यांना मुलांच्या शिक्षणाची किती काळजी आहे, हे यातून उघड होत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत इंदापूर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना विचारले असता, त्यांनी मला काहीच माहिती नाही, माहिती घेतो, असे उत्तर दिले.

संबंधित शिक्षकाच्या गैरहजेरीबाबत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलेला आहे. लवकरच गौतमेश्वर येथील प्राथमिक शाळेवर शिक्षक देऊन ज्ञानदानाचे काम सुरळीतपणे चालू ठेवण्यात येईल.

– अजिंक्य खरात, गट शिक्षणाधिकारी, इंदापूर पं.स.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news