पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रत्यारोपण परवाना नूतनीकरण न झाल्याने ससून रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सध्या रखडले आहे. परवान्याची मुदत संपून चार महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे सध्या 15 रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. महात्मा फुले योजनेंतर्गत शस्त्रक्रियेचा समावेश नसणे, प्रत्यारोपणतज्ज्ञांचाही अभाव, यामुळे ससूनमधील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण खूप कमी आहे.
प्रत्यारोपणाच्या परवान्याची मुदत या वर्षी फेब्रुवारीमध्ये संपली आहे. तपासणी पथकाने 15 दिवसांपूर्वी हॉस्पिटलला भेट दिली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील महिन्यात परवान्याचे नूतनीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ससूनचे यकृत प्रत्यारोपण केंद्र नवीन असल्याने पहिले 20-30 यकृत प्रत्यारोपण ब्रेनडेड व्यक्तींमार्फत केले जातात. त्यानंतर लाइव्ह शस्त्रक्रियांना परवानगी मिळते.
प्रत्यारोपणाचा पहिल्यांदा परवाना मिळाला. त्यानंतर आजवर केवळ 5 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णालयात प्रत्यारोपण तज्ज्ञांचीही कमतरता असल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाला खासगी रुग्णालयातून तज्ज्ञांना बोलावले जाते. कोणत्याही खासगी हॉस्पिटलबाबतीत ससूनचे एक पथक तपासणीसाठी जाते. त्यामुळे प्रक्रिया जलद होते. या टीममध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जन, एक फिजिशिअन आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांचा समावेश असतो. कोरोना काळात नियोजित अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती देण्यात आली होती.
आम्ही मुदत संपण्याच्या सहा महिने आधीच परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. 2017 मध्ये पहिल्यांदा परवाना मिळाला. दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. परवान्याची मुदत फेब—ुवारी 2023 मध्ये संपली. त्यापूर्वीच ऑगस्ट 2022 मध्ये नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, आरोग्यसेवा संचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पथकाने हॉस्पिटलला तपासणीसाठी भेट दिली होती.
– डॉ. किरणकुमार जाधव,
यकृत प्रत्यारोपण समन्वयकतपासणी समितीने नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. पुढील महिनाभरात परवाना नूतनीकरणाची अपेक्षा आहे. त्यानंतर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढू शकेल.
– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता,
ससून सर्वोपचार रुग्णालय
हेही वाचा