

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधील समावेशाने नाराज झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी आधी मंत्रिमंडळ विस्तार करा आणि मगच खातेवाटप करा, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला आहे.
शिंदे गटाचे मंत्री आमदार आणि खासदारांची बैठक रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांचा मंत्रिमंडळ समावेश झाल्याने शिंदे गटाला मिळणार्या खात्यांची संख्या घटली आहे. आता केवळ चार ते पाच जणांना मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते वाटप झाले, तर मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही? आणि झालाच, तर आपल्याला दुय्यम खाते मिळतील का? अशी चिंता शिंदे गोटातील आमदारांना लागली आहे. त्यामुळे इच्छुक आमदारांनी आता आधी मंत्रिमंडळ विस्तार करा आणि मगच खाते वाटप करा, असा आग्रह या बैठकीत शिंदेंकडे धरला.
आपल्याला मंत्रिमंडळातील निम्म्या जागा मिळणार होत्या; पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागाने खात्यांची संख्या घटली आहे. आता विस्तार लवकर करावा. त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, असे आमदारांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे सांगितले. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मुहूर्त काढला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, या बैठकीत नाराज मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली होती. बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. ही अफवा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे, असे सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या समावेशाने सरकार अधिक मजबूत झाले आहे, असेही ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामाची चर्चा फेटाळून लावली. एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत महायुतीचे मुख्यमंत्री राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढू असे सांगितले.