‘आऊटसोर्सिंग’मधून घडणार उदयोन्मुख खेळाडू; पुण्यात होणार तिघांची निवड | पुढारी

‘आऊटसोर्सिंग’मधून घडणार उदयोन्मुख खेळाडू; पुण्यात होणार तिघांची निवड

सुनील जगताप

पुणे : राज्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंमधून आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू घडविण्याच्या द़ृष्टीने योजना राबविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने 53 क्रीडा मार्गदर्शक, तर 100 सहायक मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे मानधन तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. त्यांच्या कामाचे मूल्यमापनही होणार आहे. त्यासाठी गुणांचा टेकू देण्यात आला असून, क्रीडा मार्गदर्शकांच्या आऊटसोर्सिंगमधून खेळाडू घडविण्यात येणार आहेत.

बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) नियुक्त करावयाच्या क्रीडा मार्गदर्शकांना देय मानधन अल्प असल्याने चांगल्या दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे क्रीडा विकासाच्या दृष्टीने व उच्च गुणवत्तेचे क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध होण्यासाठी भारतीय खेळ प्राधिकरणा (साई)च्या धर्तीवर राज्यात क्रीडा मार्गदर्शक व सहायक क्रीडा मार्गदर्शक पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये क्रीडा मार्गदर्शकाला 60 हजार रुपये, तर सहायक क्रीडा मार्गदर्शकाला 40 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.

दरम्यान, या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज मागविताना शैक्षणिक पात्रतेसह 25 ते 55 वयातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त इतर अटींचाही शासनाकडून समावेश करण्यात आला आहे. या क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यासाठी 4 सदस्यांची समिती स्थापन केली असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहसंचालक, विभागीय उपसंचालक आणि समितीचा सचिव म्हणून मुख्यालयातील उपसंचालकाचा समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी 75 गुण, तर शैक्षणिक अर्हतासाठी 25 गुण असे 100 गुणांमध्ये मूल्यांकनही केले जाणार आहे. या मार्गदर्शक आणि सहायक मार्गदर्शकाची नेमणूक केवळ चार वर्षांसाठी असून, प्रत्येक वर्षी क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये विभागीय उपसंचालक हे अध्यक्ष, तर जिल्हा क्रीडा अधिकारी हे सचिव असणार आहेत. त्याचबरोबर संबंधित विभागातील तालुका क्रीडा अधिकारी, संबंधित खेळाचा क्रीडा मार्गदर्शक आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा

पुण्यातील खडकवासला धरणात दुप्पट पाणी असतानाही कपात !

पुणे जिल्ह्यातील चित्र; 9 पैकी 6 आमदार छोट्या, तर 2 मोठ्या पवारांकडे; एक तटस्थ

सोलापूर : करमाळ्यातील बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात 

Back to top button