

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा उपलब्ध असतानाही आणि पुरेसा पाऊस झालेला असताना शहरात महापालिकेकडून पाणीकपात सुरूच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उपलब्ध पाणीसाठा, वातावरण आणि पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपातीवर निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी, नेहमीप्रमाणे आज (गुरुवारी) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका अधिकार्यांनी दिली आहे.
अल निनोचे संकट आणि उशिरा होणारा पाऊस, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने मे महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर गुरुवारी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. शहर व परिसारात जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली.
धरणसाखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बुधवारपर्यंत 6.15 टीएमसी (21.09 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. याच दिवशी गेल्या वर्षी धरणसाखळी क्षेत्रात 2.96 टीएमसी (10.15 टक्के) साठा होता. खडकवासला व टेमघर धरणांत गतवर्षापेक्षा दीडपट जास्त, तर पानशेत आणि वरसगाव धरणात गतवर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा यंदा आहे. खडकवासला धरणात आत्तापर्यंत 2.71 टीएमसी पाणीसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या चारही धरणांमध्ये पाणी आहे तसेच चांगला पाऊस असतानाही पालिकेकडून पाणीकपात सुरूच ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत जास्त साठा आहे. मात्र, पाणीकपात मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. धरणातील उपलब्ध पाणीसाठा, वातावरण आणि पावसाचा अंदाज घेऊन याबाबत वरिष्ठपातळीवर निर्णय होईल. त्यामुळे आज (गुरुवारी) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
– अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता,
पाणीपुरवठा विभाग, महापालिका
हेही वाचा