नवीन समीकरणामुळे शिरूरला भाजप, शिवसेनेचे भवितव्य काय? | पुढारी

नवीन समीकरणामुळे शिरूरला भाजप, शिवसेनेचे भवितव्य काय?

अभिजीत आंबेकर :

शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यानंतर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर तालुक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा सरकारमध्ये समावेश झाल्याने तालुक्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांची काय भूमिका राहील? याबाबत साशंकता आहे. कायमच रार्ष्ट्वादी विरुध्द शिवसेना-भाजप, अशीच लढाई पाहावयास मिळत होती. मात्र, या नवीन समीकरणामुळे भाजप व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे काय होणार? हा सर्वांत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात विधानसभेसाठी राष्ट्रवादी हा भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष राहिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करीतच काही कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे खर्ची घातली आहेत. शिरूर लोकसभेसाठीसुध्दा शिवसेना व राष्ट्रवादी, अशी लढाई 2009 पासून कार्यकर्ते पाहत आले आहेत. माजी आमदार कै. बाबूराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादीविरुध्द केलेला संघर्ष संपूर्ण तालुक्याने पाहिला आहे. भाजप नेत्या जयश्री पलांडे, शिवाजीराव भुजबळ, धमेंद्र खांडरे, संजय पाचंगे, आबासाहेब सोनवणे, भगवान शेळके, कैलास सोनवणे, अशा अनेक कार्यकर्त्यांनी आपली उभी हयात राष्ट्रवादीविरोधात घालवली तसेच शिवसेनेच्या अनेक लोकांनी, पदाधिकार्‍यांनी पक्षासाठी राष्ट्रवादीविरोधात काम करीत स्थानिक पदाधिकार्‍यांविरोधात राजकीय वैमनस्य घेतले आहे.

आमदार अशोक पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी 2009 पासून ज्या आमदार अशोक पवार यांना विरोध करीत आलेला कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या या नवीन समीकरणामुळे खूप अडचण होणार आहे. भाजपचे शिरूर-हवेली विधानसभेचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद यांची अवस्था मात्र बिकट होणार आहे. या नव्या युतीमुळे भाजपला फटका बसू शकतो. सर्व संस्था या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, त्यांना कसा विरोध करणार? सरकारमध्ये एक असल्यामुळे कुठलेही आंदोलन ते करू शकणार नाहीत.

हे ही वाचा : 

पुणे : अंदाजासाठी अजित पवार समर्थक कराड दौर्‍यात सहभागी !

शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

Back to top button