पुणे : अंदाजासाठी अजित पवार समर्थक कराड दौर्‍यात सहभागी ! | पुढारी

पुणे : अंदाजासाठी अजित पवार समर्थक कराड दौर्‍यात सहभागी !

सुषमा नेहरकर – शिंदे :

पुणे : राज्यातील राजकीय महानाट्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी कराड दौरा करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पवारांच्या या दौर्‍यात खेड, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यांतील काही पदाधिकारी आपल्या नेत्याला पूर्वकल्पना देऊन सहभागी झाले होते. कराड दौर्‍यात सहभागी झालेले ते पदाधिकारी शरद पवार यांच्या समर्थनासाठी नाही, तर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी सहभागी झाल्याची चर्चा सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून शरद पवार यांनी स्थानिक राजकारणातील लक्ष काढून घेतले होते. यामुळेच पुणे जिल्ह्यासह राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महापालिका, सर्व सहकारी संस्था, साखर कारखान्यांच्या निवडणुका अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली लढविल्या जात होत्या. जिल्ह्यातील बहुतेक सर्व संस्थांवर सध्या अजित पवार यांचे वर्चस्व आहे.

यामुळेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ—म निर्माण झाला, की अजित पवार यांच्यासोबत राहिचे की शरद पवार यांना साथ द्यायची. या पार्श्वभूमीवर सोमवारी पवार यांच्या कराड दौर्‍यात खेड तालुक्यातील दोन-तीन, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील काही पदाधिकारी सहभागी झाले होते. परंतु, ते आपल्या नेत्यांना सांगून या दौर्‍यामध्ये सहभागी झाले होते. याबाबत काही पदाधिकार्‍यांशी चर्चा केली असता शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी दौर्‍यात सहभागी झाले, असे एकाही पदाधिकार्‍याने सांगितले नाही. यामुळेच उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Back to top button