सांगली : फेकून दिलं.. रोटर फिरवला.. दर वाढला | पुढारी

सांगली : फेकून दिलं.. रोटर फिरवला.. दर वाढला

सांगली, नंदू गुरव : जिवाचं रान करुन पिकवलेले टोमॅटो पाच-दहा रुपये किलोनंपण कोण घेईना म्हणून वैतागून गेलेल्या शेतकर्‍यांनी टोमॅटोचे प्लॉटच्या प्लॉट काढून टाकले. बाजारात नेलेला टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकून दिला आणि शेतातील, ठेवणीतला सारा माल संपल्यावर आता अचानक टोमॅटोला दर आला. तब्बल दीडशे रुपये किलोचा दर आज टोमॅटोला आला असताना दुसर्‍या बाजूला टोमॅटो पिकवणार्‍या शेतकर्‍याला त्याचा किती फायदा होतोय, हा सवाल आहे.

अवघ्या पंधरा दिवसांअगोदर टोमॅटो लावणार्‍यांच्या नशिबी नुसता चिखल होता. काबाडकष्ट करुन आणि पैसा ओतून पिकवलेला टोमॅटो, पण बाजारात तो पाच रुपये किलोनं पण कोण घेईना. रक्त आटवून पिकवलेले लालभडक टोमॅटो, पण त्याची पार माती झाली. दरच नाही. पिकवलेला टोमॅटो काढण्याइतका पण पैसा मिळाला नाही. तो बाजारात नेऊन फुकटात देण्यासाठीसुद्धा पैसा लागतो. पण तोही जवळ राहिला नाही. शेतकर्‍यांनी बाजारात नेलेली टोमॅटोची बकेट आहे तशी रस्त्यावर सोडून दिली. शहरातील बाजारच्या रस्त्यावर पडलेले लालभडक टोमॅटोचे ढीगच्या ढीग बघून ना व्यापार्‍यांचा जीव कळवळला – ना ग्राहकाचा.

दुसरं पीक घ्यायचं म्हणून शेतकर्‍यांनी टोमॅटोच्या प्लॉटवर रोटर फिरवले. रसरशीत टोमॅटोच्या पिकाचं खत केलं. जे टोमॅटो पिकवले ते मातीत घालायची वेळ आली. पण करणार काय? काढून टाकलेल्या लाल टोमॅटोच्या ढिगानं रानातील बांध लालेलाल झाले आहेत. त्याचा चिखल तुडवत शेतकरी दुसर्‍या पिकाच्या पेरणीला लागलेत. रानातनं टोमॅटोचे प्लॉट काढून टाकले. रोटर फिरवले आणि बाजारानं उचल खाल्ली. ही उचल इतकी दांडगी झाली की आज बाजारात टोमॅटोचा दर सव्वाशे-दीडशे रुपये किलोवर गेला आहे आणि शेतकर्‍याच्या नशिबी पुन्हा चिखल आला आहे. दर आलाय आणि मालच नाही, अशा कात्रीत सापडलेला शेतकरी कुजत पडलेल्या टोमॅटोच्या बांधाकडं बघत बसला आहे.

Back to top button