‘पीएसआय’च्या परीक्षेत सुनील कचकड राज्यात प्रथम

‘पीएसआय’च्या परीक्षेत सुनील कचकड राज्यात प्रथम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, 65 पदांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. सुनील कचकड यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकाविला असून, निर्मलकुमार भोसले यांनी दुसरा, तर गणेश जाधव यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाचा निकाल रखडला होता. हा निकाल जाहीर करण्याची मागणी सातत्याने उमेदवारांकडून करण्यात येत होती. अखेर हा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय मागविण्यात आला आहे. त्यासाठी 11 जुलै ही अंतिम मुदत आहे.

जाहीर करण्यात आलेली निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारसीमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले.

आव्हानांना सामोरे जाण्याच्या तयारीने मिळवून दिले यश

स्वअभ्यास, चिकाटी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी यामुळेच पीएसआयच्या परीक्षेत यश मिळविता आल्याची भावना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत राज्यात दुसरा आलेल्या निर्मलकुमार भोसले याने व्यक्त केली. तो मूळचा पंढरपूरचा असून, त्याने पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. निर्मलकुमार यांनी आपल्या यशाचे श्रेय हे आपले आईवडील आणि मित्रपरिवाराला दिले आहे. निर्मलकुमार भोसले याचे वडील सूर्यकांत आणि आई राधा हे पंढरपुरात राहतात.

सूर्यकांत भोसले हे शेतकरी असून, बेकरीचाही व्यवसाय करतात. पुण्यात आल्यानंतर निर्मलकुमार यांना मित्रांनी मदत केली. त्यांच्याकडूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना अभ्यासाबरोबरच गायन आणि व्यायाम यांची आवड आहे. सायबर क्राईम विषयात प्रावीण्य मिळवून त्यामध्ये पुढील करिअर करायचे असल्याचे त्यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news