पुणे : वडगाव शेरीत मुळीक, हडपसरमध्ये टिळेकरांचे काय होणार? | पुढारी

पुणे : वडगाव शेरीत मुळीक, हडपसरमध्ये टिळेकरांचे काय होणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे शहरातील दोन्ही आमदार गेल्यास भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर या दोघांची विधानसभेची उमेदवारी धोक्यात येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार आज काय भूमिका घेणार? यावर मुळीक आणि टिळेकर यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शहरात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे असे राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. हे दोन्ही आमदार नक्की शरद पवारांसमवेत जाणार की अजित पवार यांच्या समवेत जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हे दोघेही अजितदादांसमवेत गेल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहरातील या दोन्ही जागांवरील दावेदारीच धोक्यात येऊ शकते.

वडगाव शेरीत शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे इच्छुक आहेत. तर हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे निवडणुकीच्या तयारीत आहेत. मात्र, आमदार टिंगरे आणि तुपे यांच्यामुळे भाजपमधील या सर्व इच्छुकांना विधानसभेच्या उमेदवारीतून तरी किमान माघार घ्यावी लागेल. मात्र, हे दोन्ही आमदार अजितदादांसमवेत गेले आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ते कायम राहिल्यास ही परिस्थिती निर्माण होऊ शकेल. मुंबईत आज होणार्‍या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतरच हे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री नागपुरातून तातडीने मुंबईला परतले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | CM Eknath Shinde

भारताकडून अफगाणिस्तानला १०,००० मेट्रिक टन गव्हाची मदत | Wheat aid from India to Afghanistan

 

Back to top button