Ajit pawar : अजित पवारांच्या पालकमंत्रिपदाने होणार भाजपची अडचण! | पुढारी

Ajit pawar : अजित पवारांच्या पालकमंत्रिपदाने होणार भाजपची अडचण!

उरुळी कांचन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सत्तेच्या पॅटर्नमध्ये विरोध पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला भाजप व शिंदे गटाने सामावून घेतल्याने पुणे जिल्ह्यात आता पालकमंत्रिपदाची खुर्ची बदलणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा पुन्हा आता अजित पवार यांच्यावर येणार असल्याच्या शक्यतेने जिल्ह्यात भाजप लोकप्रतिनिधी,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना पवार यांच्या अधिपत्याखाली कारभार पाहावा लागणार आहे. अजित पवार यांच्या प्रशासनात भाजप लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांना योग्य न्याय मिळेल का, म्हणून हे सर्व जण चिंताग्रस्त झाले असून, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची पायरी चढणे आता सत्ताधारी भाजपच्या मंडळींसाठी मोठी कसरत ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत असणार्‍या काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी निधीवाटपासह राजकीय रसद मित्र पक्षांना दिली जात नसल्याचा वारंवार आरोप करण्यात येत होता. या विवादावरून सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत निर्णय घेण्यात आले. आता हाच सत्तेचा प्रयोग पुणे जिल्ह्यात भाजपच्या वाटेला येतो की काय, असे भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वाटू लागले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. अशावेळी अजित पवार यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील विकास निधीसह महत्त्वाची कामे ही भाजप लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समन्वय साधून करावी लागणार आहे. भाजप मंडळींना इच्छा नसूनही त्यांची पायरी चढावी लागणार आहे.

शिरूर-हवेलीत अनेकांची गोची?

शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक जणांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतली आहे. त्यापैकी मागील काळात अनेकांचे प्रवेश झाले आहेत. तर काहींचा आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्ष प्रवेश होणार होता. मात्र आता सत्तेची सूत्रे बदलल्याने या मंडळीची विरोधाची धार गळून पडणार आहे. तसेच भाजपच्या मंडळींचा सत्तेचा वाटा घटल्याने राष्ट्रवादीशी मैत्री करावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेत असूनही सत्तेचे बाहुले होण्याची चिंता भाजपच्या मंडळींना लागली आहे.

हेही वाचा

Sharad Pawar : शरद पवारांचे खेड शिवापूरला जोरदार स्वागत

कोपरगाव : ‘तो’ फुलवितो वाचनातून चैतन्य..!

Back to top button