पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट यांनी आता एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याने शहरातील राजकीय समीकरणे गुंतागुतीची ठरणार आहेत. या नव्या युतीने भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुकांची कोंडी होणार आहे. महापालिका निवडणुकीत थेट राष्ट्रवादीतील इच्छुक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी थेट शिवसेना-भाजपसमवेत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात या घडामोडीने खळबळ उडाली आहे. या घटनेचे परिणाम आघाडी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. प्रामुख्याने पुणे शहरात भाजपचा प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस हाच होता. तुलनेने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांची ताकद कमी आहे. आता मात्र राष्ट्रवादीतील मोठा गट अजितदादांच्या रूपाने भाजपसमवेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्हींची ताकद एकत्र आल्यास त्याचा फटका काँग्रेस आणि ठाकरे गटाला होऊ शकतो.
महापालिकेच्या 2017 ते 2022 या कालावधीत राष्ट्रवादीचे 42, तर भाजपचे 99 नगरसेवक होते. आता राष्ट्रवादीमधील किमान 20 ते 25 माजी नगरसेवक अजितदादांसमवेत येऊ शकतात. अशा परिस्थितीत या सर्व जागांवरील उमेदवारांसाठी भाजपला जागा सोडावी लागेल. त्याचा फटका भाजपच्या इच्छुकांना बसेल. याउलट भाजपच्या 99 जागांवर अजितदादांना समर्थकांना उमेदवारीच मिळणार नाही.
त्यामुळे त्यांच्यासमवेत जाण्याची इच्छा असली, तरी अनेकांना उमेदवारीसाठी तरी शरद पवारांसमवेत राहावे लागेल. विशेष म्हणजे अजित पवारांसमवेत येणार्या माजी नगरसेवकांसाठी भाजपने जरी उमेदवार दिला नाही तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. त्यामुळे एकाच पक्षातील दोन जण एकमेकांच्या समोर येऊ शकतात.
दरम्यान, या सर्व राजकीय परिस्थितीचा काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे यांना पक्ष वाढीसाठी फायदा होऊ शकतो. ठाकरे आणि पवारांना मिळणारी सहानुभूती महाविकास आघाडीने मतांच्या माध्यमातून मिळाली, तर निश्चितपणे या राष्ट्रवादीसह या दोन्ही पक्षांच्या जागा वाढू शकतात. मात्र, त्यासाठी अजितदादांसमवेत किती जण येणार आणि पवारांसमवेत राष्ट्रवादीत किती जण राहणार यावरच पुढील सर्व राजकीय समीकरणे ठरणार आहेत. विधानसभा निवडणुकीत हीच अवस्था राहणार असून, त्यासाठी नक्की कोण कोणासमवेत जाणार याची वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा