नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उन्हाळी सुट्ट्या संपवून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सोमवारपासून प्रारंभ झाला. तेथील कामकाज आता पेपरलेस झाले आहे. नव्या सत्रात सर्वांचे स्वागत करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल सुरू झाली असून, आता न्यायालयीन कामकाजात कागदांचा, फाईल्सचा कमीत कमी वापर करणे शक्य असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच कोर्टरूम आणि बाररूम येथे वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती वकिलांना मोफत असणार आहे. न्यायालयाचे कामकाज जरी बुकलेस, पेपरलेस होणार असले, तरी हे सारे आता डिजिटली उपलब्ध राहणार असल्याने काम अधिक सुटसुटीत होणार आहे.
ई-इनिशिएटिव्ह अंतर्गत बदल
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सूत्रे स्वीकारताच ई-इनिशिएटिव्ह नावाने न्यायालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या सहा आठवड्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच कामाला वेग आला.
त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन कोर्टरूम
पूर्णपणे पेपरलेस झाल्या आहेत. आगामी काळात सर्व कोर्टरूम पेपरलेस होणार आहेत. सध्या सर्व कोर्टरूम, बाररूम आणि सर्व लॉबीज् वायफाय सेवेने सुसज्ज करण्यात आल्या आहेत. वायफाय सुविधा पहिल्या टप्प्यात वकिलांना व लवकरच पक्षकार, माध्यमकर्मी आणि इतर कर्मचार्यांना उपलब्ध होणार आहे.
सुप्रीम कोर्टात काय झाले बदल?
* दोन कोर्टरूम पेपरलेस
* मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध
* सायवायफाय सेवेला लॉग इन करून वापरता येणार
* डिजिटल लायब्ररीत सर्व पुस्तके, संदर्भ उपलब्ध
* न्यायमूर्ती आणि युक्तिवाद करणार्या वकिलांना पॉपअप स्क्रीन;
* त्यावरच सेव्ह केलेली कागदपत्रे, संदर्भ सुनावणीसाठी वापरता येणार
* कागदपत्रांच्या फाईल्सचे गठ्ठे, पुस्तकांचे बाड होणार हद्दपार
* ऑनलाईन सुनावणीची सोय; न्यायमूर्तींसाठी मोठे स्क्रीन