पुणे : सुधारगृहातील मुलावर अत्याचार करणार्‍यास 7 वर्षे सक्तमजुरी

पुणे : सुधारगृहातील मुलावर अत्याचार करणार्‍यास 7 वर्षे सक्तमजुरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी नितीन नारायण कदम (वय 20) यास न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलाला देण्यात यावी, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे कारावास भोगावा लागेल असेही सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी निकालात नमूद केले आहे.

या प्रकरणी 30 वर्षीय समुपदेशकाने फिर्याद दिली होती. 30 जून 2017 रोजी रात्री 8 ते 10 च्या सुमारास ही घटना घडली. कदम याने पीडित मुलाला बाथरूममध्ये नेत त्याला मारण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सरकारी वकील लीना पाठक व जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. त्यामध्ये समुपदेशक, पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. पाठक यांनी केला. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी तपासी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अरुण गौड यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण मोरे, न्यायालयीन कामकाजात गिरमे आणि कायगुडे यांनी मदत केली.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news