पीक विम्याच्या धर्तीवर राज्यात आता पशुधन विमा | पुढारी

पीक विम्याच्या धर्तीवर राज्यात आता पशुधन विमा

कोल्हापूर, अनिल देशमुख : पीक विम्याच्या धर्तीवरच राज्यातील पशुधनासाठीही विमा योजना राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्याद़ृष्टीने विमा कंपन्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. ही योजना अस्तित्वात आली तर राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लम्पी रोेगाने पशुपालकांची झोप उडवली आहे. राज्य शासनाकडून लम्पीने जनावरांचा मृत्यू होऊन नुकसान झालेल्या शेतकरी, पशुपालकांना भरपाई दिली जात आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरणही केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पशूंच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला असून, विम्याद्वारे पशुपालकांना संरक्षण देता येईल का, याद़ृष्टीने राज्य सरकार विचार करत आहे.

राज्यात यापूर्वी पशुधन विमा योजना राबविली जात होती. मात्र, या योजनेला मर्यादा असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. यामुळे राज्यात शेतकर्‍यांसाठी एक रुपयात कृषी पीक विमा योजना लागू केली आहे, त्याच धर्तीवर पशुधनासाठीही विमा योजना सुरू करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

राज्यात सव्वातीन कोटी पशुधन

राज्यात 2019 च्या पशुगणनेनुसार 3 कोटी 30 लाख 80 हजार पशुधनाची संख्या आहे. राज्यात 1997 साली पशुधनाची संख्या 4 कोटी होती. ती गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. राज्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांत वर्षभरात 81 लाख 10 हजार जनावरांवर उपचार करण्यात आल्याची आकडेवारी आहे.

पशुधनात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर

गाय, बैल संवर्गातील पशुधन
1 कोटी 39 लाख 93 हजार
म्हैस, रेडा संवर्गातील पशुधन 56 लाख 4 हजार
शेळी, मेंढी संवर्गातील पशुधन
1 कोटी 32 लाख 85 हजार
इतर संवर्गातील पशुधन 1 लाख 98 हजार

Back to top button