बारामती… पवारांच्या संघर्षाचे मुख्य रणांगण | पुढारी

बारामती... पवारांच्या संघर्षाचे मुख्य रणांगण

राजेंद्र गलांडे

बारामती : गेल्या तीस वर्षांपासून बारामतीची सत्तासूत्रे अजित पवार यांच्याच हातात असल्याने येथे पक्षावर त्यांचीच हुकमत राहणार असल्याचे दिसत असले, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार काय मांडणी करतात? याकडे पाहणेही गरजेचे ठरणार आहे. राज्यातील संघर्षाचे मुख्य रणांगण बारामतीच राहणार, हे नक्की आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळी बारामतीवर एकहाती वर्चस्व होते. खुद्द शरद पवार हे येथील निवडणुकीत एका रात्रीत काहीही करू शकतात, असे सर्वत्र बोलले जायचे.

अजित पवार हे राजकारणात आल्यानंतर शरद पवार यांनी ही सूत्रे अजित पवार यांच्या हाती दिली. त्यांनी अल्पावधीतच आपली पकड बारामतीच्या राजकारणावर निर्माण केली. 1990 ते 2000 सालापर्यंत शरद पवार काहीअंशी लक्ष घालत होते. परंतु, त्यानंतर गेली दोन दशके येथे अजित पवार यांनी सगळी सत्तासूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत.

बारामती तालुक्यातील सहकारी साखर कारखाने, बँका, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती या सर्व ठिकाणी अजित पवार यांचे प्राबल्य आहे. या सर्व संस्था अजित पवारांनी उत्तमरीत्या चालविल्या आहेत. विश्वासू सहकार्‍यांना तेथे संधी दिली आहे. त्यामुळे अजित पवार जिकडे जातील तिकडे त्यांचे सहकारी जाण्यास कधीही तयार असतात.

निवडणुकीच्या कामात शरद पवार यांनी लक्ष काढत त्यांचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे सोपविले. परिणामी, अजित पवार यांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी अनेकांना पदे देत मोठे केले. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. आता ते स्वतः भाजप-सेना सरकारमध्ये सहभागी झाले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आता काय भूमिका घेतात? आणि पुन्हा कशी बांधणी करतात? यावर बर्‍याच बाबी अवलंबून असल्या, तरी सध्या बारामतीत कार्यकर्ते अजित पवार यांच्याच पाठीशी उभे (पान 2 वर)

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्षवाढीसाठीच असावा. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.

– सचिन सातव, अध्यक्ष, बारामती सहकारी बँक

आम्ही अजित पवार यांच्याबरोबर आहोत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे बारामतीकरांना व महाराष्ट्राला फायदा होईल. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा फायदाच होणार आहे. सत्तेत असल्याने बारामतीत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण होतील. बारामती विकासाच्या दिशेने मोठी झेप घेईल.

– जय पाटील, शहराध्यक्ष, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा

भिवंडी : भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बालकाचा मृत्यू

जळगावात धर्मांतराचा प्रयत्न फसला, चार जणांना अटक

अजित पवारांच्या बंडानंतर सोनिया गांधी यांची शरद पवारांशी चर्चा

Back to top button