पुणे: राजभवनाच्या सिटींग प्रोटोकॉलचा विद्यापीठ प्रशासनाकडून भंग ! परिक्षा संचालक आणि वित्त व लेखा अधिकारी यांना अपमानजनक वागणूक | पुढारी

पुणे: राजभवनाच्या सिटींग प्रोटोकॉलचा विद्यापीठ प्रशासनाकडून भंग ! परिक्षा संचालक आणि वित्त व लेखा अधिकारी यांना अपमानजनक वागणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 122 व्या पदवीप्रदान सोहळ्यात राजभवनाच्या सिटींग प्रोटोकॉलचा विद्यापीठ प्रशासनाने भंग केला आणि सात खुर्च्यांऐवजी पाच खुर्च्या लावल्या. त्यामुळे पदवी प्रदान सोहळ्यातच परिक्षा संचालक आणि वित्त व लेखा अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे उघडकीस आले आहे.

ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 122 वा पदवी प्रदान सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इनडोअर स्टेडियममध्ये सायंकाळी 4 वाजता संपन्न झाला. यावेळी राजभवनाच्या राजशिष्टाचाराअंतर्गत पूर्वनियोजित बैठक व्यवस्थेनुसार अग्रभागी 7 खुर्च्यांचे नियोजन होते. परंतु, अचानक त्या रांगेतून 2 खुर्च्या मागे ठेवण्यात आल्यामुळे परिक्षा संचालक डॉ.महेश काकडे यांनी आक्षेप घेतला. पदवी प्रदान सोहळ्याचे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी असताना देखील डॉ. काकडे यांना मागे बसविण्यात आले. अपमानजनक वागणूक देत असताना कुलगुरू प्रा. गोसावी यांनी मात्र कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले. कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजभवनचे एडीसी दिलीप लोढा यांनी बैठक व्यवस्थेमध्ये पुन्हा बदल करण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. कुलगुरू प्रा.गोसावी यांनी मध्यस्थी केली असती, तर वाद टाळता आला असता.

दरम्यान पदवी प्रदान समारंभासाठी निवडक विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक केल्यामुळे एकच गर्दी झाली होती. पालकांची गर्दी आवरताना सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचारी यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. काही पत्रकारांना सभागृहात जाण्यापासून अडविण्यात आल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती होती. राजभवनाकडून राजशिष्टाचारानुसार बैठक व्यवस्था ठरवून दिलेली असताना देखील अचानक बैठक व्यवस्थेत बदल केल्यामुळे व्यासपीठावर काही काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा:

कुंडमळा येथे तळेगाव पोलीस स्टेशनने पर्यटकांसाठी लावले धोक्याच्या सूचनांचे फलक

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री शिंदे

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

 

Back to top button