पुणे जिल्ह्यात जेमतेम १२०० हेक्टरवर पेरण्या, पश्चिम पट्ट्यात भात रोप वाटिका टाकण्यास वेग | पुढारी

पुणे जिल्ह्यात जेमतेम १२०० हेक्टरवर पेरण्या, पश्चिम पट्ट्यात भात रोप वाटिका टाकण्यास वेग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र सुमारे 2 लाख 25 हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग व अन्य पिकांची मिळून जेमतेम बाराशे हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. तर पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांत मान्सूनच्या हजेरीमुळे भाताच्या रोपवाटिका टाकण्याच्या कामास वेग आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 176 मिलिमिटर इतके आहे. जूनअखेर सुमारे 90.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी जून महिनाअखेर 678 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. तर जून महिनाअखेर ज्या महसूल मंडळामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, अशा मंडळांमध्ये पीकनिहाय झालेल्या पेरण्या हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : मका 610, बाजरी 42, सोयाबीन 460, भुईमूग 85 मिळून 1 हजार 197 हेक्टरचा समावेश आहे.

चालू वर्ष 2023-24 करिता भाताचे 13 हजार 732 क्विंटल, सोयाबीनचे 9 हजार 232 क्विंटल व इतर पिकांचे मिळून एकूण 28 हजार 262 क्विंटल इतके बियाणे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे खरिपासाठी एकूण 1 लाख 53 हजार 671 मे. टन खतसाठा उपलब्ध झाला असून, 64 हजार 203 मे. टन इतकी विक्री झालेली आहे. सद्य:स्थितीत 88 हजार मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये युरिया 42 हजार 476 मे. टन, एन. पी. के. एस. 29 हजार 31 मे. टन, एस. एस. पी. 9 हजार 857 मे. टन आणि डीएपीचा 7 हजार 353 मे. टन साठा उपलब्ध आहे. शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी खरीप पिकांच्या पेरण्या करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा:

समृद्धी महामार्गावरील अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी एक आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं की…”

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

समृद्धी महामार्ग ठरतोय किलर मार्ग; ५ महिन्यांत ९५ मृत्यू, ३३ टक्के अपघात महामार्ग संमोहनमुळे

 

 

Back to top button