समृद्धी महामार्गावरील अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी एक आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं की…” | पुढारी

समृद्धी महामार्गावरील अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी एक आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं की…”

पुणे, पुढारी ऑनलाईन: बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. खासगी बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातावर देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थना केली. यावेळी पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला एक आठवणही करून दिली. पवारांनी शनिवारी (१ जुलै) ट्वीट करत भूमिका मांडली.

खासदार शरद पवार म्हणाले, “बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृद्धी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थना.”

“बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत मी एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. तसेच राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी केली होती. अपघात रोखण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असेही सुचवले होते,” अशी आठवण पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला करून दिली.

हेही वाचा:

पती-पत्‍नीमधील संबंध बिघडणे हे गर्भपातास परवानगी देण्‍याचे कारण ठरत नाही : छत्तीसगड उच्‍च न्‍यायालय

रत्‍नागिरी : चिपळूणसाठी स्‍वतंत्र गणपती स्‍पेशल मेमू अनारक्षित रेल्‍वे धावणार!

मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल, अशी आहे खासियत

 

 

Back to top button