पिंपरी : दहशहतीचा पिस्तूल पॅटर्न; कारवाईनंतरही पिस्तुलं सहज उपलब्ध

पिंपरी : दहशहतीचा पिस्तूल पॅटर्न; कारवाईनंतरही पिस्तुलं सहज उपलब्ध
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : मावळ येथील किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पिस्तुलासह अटक करण्यात आली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचणार्‍या तिघांना पिस्तुलासह जेरबंद करण्यात आले. ज्यामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उद्योगनगरी परिसरात 'पिस्तूल पॅटर्न' खोलवर रुजत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

माथाडीचा वाद अन् बदल्याची आग

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा आरोपींशी माथाडीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली आरोपींनी खंडणीविरोधी पथकाजवळ दिली आहे. तसेच, दरोडाविरोधी पथकाने अटक केलेले दोघेजण दिवंगत किशोर आवारे यांचे निकटवर्तीय असल्याने तेदेखील आवारेंच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

विशेष पथकाची गरज

तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे पदभार असतानादेखील अशाच प्रकारे गावठी कट्ट्यांचे प्रमाण वाढले होते. चाकण आणि सांगवी येथील खूनप्रकणात गावठी कट्टे वापरले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी कट्ट्यांचा व्यापार रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्यावर पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. आता पुन्हा अशा पथकाची गरज निर्माण झाली आहे.

रॅकेटची पाळेमुळे घट्ट

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शस्त्र बाळगणार्‍यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना म्हणावे असे यश मिळाले नाही. त्यामुळे कारवाई होत असूनही तितक्याच पटीने जास्त शस्त्र शहरात येत आहेत. यावर अंकुश लावण्याची गरज आहे.

पाच महिन्यांत 74 जणांना अटक

शहर परिसरात पिस्तूल सहज उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आले आहेत. मागील पाच महिन्यांत पिस्तूल बाळगणारे 74 जण पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांच्याकडून 69 पिस्तूल जप्त करण्यात आल्याची पोलिसदप्तरी नोंद आहे, असे असले तरीही पोलिसांना पिस्तूल पॅटर्न मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

320 शस्त्रे जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील पाच महिन्यांत शहर परिसरात तब्बल 320 शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये 69 पिस्तुलं आणि 251 इतर घातक शस्त्रांचा समावेश आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 260 गुन्हे दाखल आहेत.

अवैध पिस्तूल वापरणार्‍या गुंडांची मुस्कटदाबी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन मोठे कट उधळून लावले आहेत. आगामी काळात पिस्तूल रॅकेटच्या मुळाशी जाऊन ते उखडून टाकण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

– विनय कुमार चौबे,
पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news