पिंपरी : पवना धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात | पुढारी

पिंपरी : पवना धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत होता; मात्र गेले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि. 29) पाणीसाठा वाढून तो 18.14 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर असलेली संभाव्य पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वाढली आहे.

जून महिना संपत आला तरी, मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नव्हती. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत होता. तो साठा जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपात लागू करण्याबाबत नियोजन सुरू होते. धरणात मंगळवार (दि.27) पर्यंत 17.55 टक्के इतका पाणीसाठा होता.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. डोंगर, ओढे पाण्याने वाहू लागले आहेत. तर, काही ठिकाणी धबधबे सुरू झाले आहे. ते पाणी धरण क्षेत्रात जमा होऊ लागले आहे. बुधवारी (दि. 28) धरणातील पाणीसाठा 17.67 टक्के इतका झाला. तर, गुरुवारी (दि. 29) पाणीसाठा 18.14 टक्के इतका वाढला आहे.

गुरुवारी 55 मिलिलीटर पाण्याची नोंद झाली आहे. धरणात पाणीसाठा वाढू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्यावर्षी या दिवशी धरणात 17.79 टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा असल्याचे दिसत आहे. धरणात पाणी वाढण्यास सुरुवात झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास 15 ऑगस्टपर्यंत धरण 100 टक्के भरले, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

पिंपरी : दहशहतीचा पिस्तूल पॅटर्न; कारवाईनंतरही पिस्तुलं सहज उपलब्ध

वारकर्‍यांचा परतीचा प्रवास सुरू; नगर-सोलापूर महामार्गावर वाहनांची झुंबड

Back to top button