खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम | पुढारी

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला धरण साखळीत अद्यापही पावसाने जोर धरला नाही. बुधवारप्रमाणे (दि. 28) गुरुवारीही पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात पावसाची रिमझिम सुरू आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण साखळीत 4.60 टीएमसी (15.78 टक्के) इतका साठा झाला होता. गेल्या 24 तासांत धरण साठ्यात 0.10 टीएमसी इतकी अत्यल्प भर पडली. धरण क्षेत्रात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नसल्याने जुलै महिन्यातील पावसानुसार पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या दिवसभरात टेमघर येथे 15, वरसगाव येथे 5, पानशेत येथे 3 व खडकवासला येथे केवळ 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुसळधार पाऊस पडणार्‍या रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत-वरसगाव खोर्‍यासह मुठा-सिंहगड भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी सद्य:स्थितीत धरण साखळीत 2.64 टीएमसी (9.05 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण साखळीत दोन टीएमसी जादा पाणी आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नाही. सध्या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी रिमझिम सुरू आहे. मात्र, जुलै महिन्यात पडणार्‍या पावसाच्या प्रमाणानुसार पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबत महापालिकेला
कळविले आहे.
       -मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

हे ही वाचा :

कोपरगाव : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप व्यवस्थापकाचा चाकूने भोसकून खून

अहमदनगर : केडगावात परप्रांतीय युवकाचा गळा आवळून खून

Back to top button