म्हणे, बदलीसाठी मोजले दीड कोटी! आता वसुलीसाठी होतेय फाईलची अडवाअडवी ! | पुढारी

म्हणे, बदलीसाठी मोजले दीड कोटी! आता वसुलीसाठी होतेय फाईलची अडवाअडवी !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाच्या सेवेतून बदली होऊन महापालिकेत आलेल्या एका विभाग प्रमुखांनी निविदेत आर्थिक मलईची मागणी सुरू केली आहे. ‘बदलीसाठी आपण दीड कोटी रुपये मोजले असून, ते वसूल झालेच पाहिजेत’, असे स्पष्ट सांगत प्रत्येक फाईलची या अधिकार्‍याकडून अडवाअडवी केली जात असल्याने आता त्याच्या सहकार्‍यांनीच थेट वरिष्ठांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे.
महापालिकेच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या प्रमुखपदी आवश्यक असलेल्या पात्रतेचा अधिकारी सद्य:स्थितीत प्रशासनाकडे नसल्याने शासनाकडील अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकार्‍याने संबधित पदावर येण्यासाठी एका मंत्र्याला दीड कोटी रुपये मोजले असल्याची चर्चा आहे. या अधिकार्‍याकडूनही अप्रत्यक्षपणे तसे सांगितले जात आहे. त्यामुळे ती रक्कम वसूल होण्यासाठी या विभागातील प्रत्येक कामाच्या आणि खरेदीच्या निविदेत किती आर्थिक मलई मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ती फाईल पुढे सरकविली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांच्या निकटवर्तीयाला संबधित अधिकार्‍याचा हा अनुभव आला. त्यानंतर त्याने एका उच्चपदस्थ अधिकार्‍याला हा प्रकार सांगितला. मात्र, सद्य:स्थितीत आयुक्त विक्रम कुमार हे रजेवर असल्याने त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. आयुक्त रुजू झाल्यानंतर या प्रकाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

पुणे : बनावट प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आठ जणांवर दोषारोपपत्र

पुणे : गॅस संपल्यामुळे लाकडावर अंत्यसंस्कार ; धोबीघाट स्मशानभूमीतील घटना 

Back to top button