आझाद यांच्यावरील हल्लेखोरांवर कारवाई करा ; रामदास आठवले यांची मागणी | पुढारी

आझाद यांच्यावरील हल्लेखोरांवर कारवाई करा ; रामदास आठवले यांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी,’ अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

आठवले म्हणाले, ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्रपक्षांची मुंबईत बैठक झाली असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ’रिपाइं’ला एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागावाटपात विधान परिषदेची एक जागा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र, जिथे दलितवस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन पद्धत बंद करण्याची मागणी करत आहोत.’ ‘देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही,’ असे आठवले यांनी सांगितले.

सरकारची कामगिरी चांगली
‘वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली असून, रोजगारनिर्मितीस प्राधान्य दिले जात आहे. राज्यातही उद्योग वाढवले जात असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे,’ असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाला विरोध नाही
‘मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे. भटक्या विमुक्त, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत अभ्यास सुरू आहे. त्याचा फायदा सर्व समाजाला होईल,’ असे त्यांनी सांगितले. नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी रिपाइं प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकारला धोका नाही
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले चालले असून, वर्षपूर्तीच्या त्यांना शुभेच्छा देतो. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील पाच वर्षे त्यांचीच सत्ता येईल. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हते. दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : 

नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर जिल्ह्यात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

Back to top button