पुणे जिल्हयातील नागापूर येथे समाजकंटकाने कांदा बराकीत टाकला युरिया | पुढारी

पुणे जिल्हयातील नागापूर येथे समाजकंटकाने कांदा बराकीत टाकला युरिया

पारगाव (पुणे )  : पुढारी वृत्तसेवा : नागापूर (ता. आंबेगाव) येथील दोन शेतकर्‍यांच्या कांदा बराकीत समाजकंटकाने युरिया टाकल्याने जवळपास 750 पिशव्या कांद्याचे सडून नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. 28) सकाळी उघडकीस आली. पंढरीनाथ सोपान शिंदे व बाळाराम मारुती शिंदे अशी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. नागापूर येथील श्रीक्षेत्र थापलिंग गडाच्या पूर्वेकडील पायथ्याला पंढरीनाथ व बाळाराम शिंदे या शेतकर्‍यांच्या कांदा बराकी शेजारी-शेजारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी कांद्याची काढणी करून या शेतकर्‍यांनी कांदा बराकीत साठवला होता. त्यातील पंढरीनाथ सोपान शिंदे यांच्या बराकीत 250 कांदा पिशव्या, तर बाळाराम शिंदे यांच्या बराकीत जवळपास 500 कांदा पिशव्या होत्या.

पाच दिवसांपूर्वी पंढरीनाथ शिंदे यांच्या बराकीतील कांद्यांमधून पाणी सुटून ते कांदे अचानक सडत चालल्याचे लक्षात आल्याने पंढरीनाथ शिंदे यांनी कांदा बराकी फोडून त्यातील कांदा बाहेर उन्हात सुकायला टाकला होता; परंतु बुधवारी (दि. 28) सकाळी बाळाराम शिंदे यांच्या कांदा बराकीशेजारून सुनील पंढरीनाथ शिंदे हे शेतात चालले असताना त्यांना कांदा सडल्याचा वास आला. त्यांनी बराकीत डोकावून पाहिले तर ठिकठिकाणी युरिया टाकल्याचे त्यांना दिसून आले. बराकीतील कांद्यांना पाणी सुटले होते. त्यांनी बाळाराम यांना घटनेची खबर दिली.

बाळाराम यांनी बराकीतील कांद्याची पाहणी केली असता, त्यांना कांदे सडल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस पाटील संजय पोहकर यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सरपंच गणेश यादव, उपसरपंच भरत म्हस्के, सुनील शिंदे, चंद्रकांत शिंदे, प्रकाश पवार यांनी दोन्ही बराकींची पाहणी केली. यावेळी पंढरीनाथ शिंदे यांच्या बराकीतील कांदा देखील युरिया टाकल्यानेच सडल्याचे निष्पन्न झाले.
कांद्याला सध्या 10 किलोला 100 ते 120 रुपये बाजारभाव मिळत आहे. परंतु कांदा पिकासाठी गुंतवलेल्या भांडवलाच्या तुलनेत हा बाजारभाव कमीच आहे. त्यातच आता समाजकंटकांच्या अशा कृत्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

हे ही वाचा :  

पुणे : स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी दगडाला धडकली ; 70 ते 75 प्रवासी बालंबाल बचावले

अहमदनगर : तीन कुटुंबांचे पुनर्वसन ! समाजकल्याणमधून तिघांना शासकीय नोकरी

 

Back to top button