पुणे महापालिकेच्या आयटीआयमध्ये ओडिशाच्या धर्तीवर तंत्रज्ञान | पुढारी

पुणे महापालिकेच्या आयटीआयमध्ये ओडिशाच्या धर्तीवर तंत्रज्ञान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ओडिशाच्या धर्तीवर नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि अत्यावश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवार पेठेमध्ये महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे संबंधित आयटीआयची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्या वेळी विद्यालयाची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काही प्रमाणात निधी मंजूर करून तेथे दुरुस्ती केली.

त्याचबरोबर ओडिशाच्या धर्तीवर आयटीआय व्हावे, ही संकल्पना त्यांनी शिक्षकांपुढे मांडली. त्यासाठी काही शिक्षकांना ओडिशा येथील आयटीआय पाहण्यासाठी पाठविले. तेथे नुकतीच भेट देऊन आल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आयटीआयसाठी उपाययोजना सुचविल्या.
याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ’पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये 40 टक्के मनुष्यबळ ओडिशामधून येते. त्यामुळे तेथील आयटीआय प्रकल्पाची मी पाहणी केली, त्याच पद्धतीने महापालिकेचे आयटीआय व्हावे, इथल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, नोकरी मिळावी, या हेतूने शिक्षकांना ओडिशा येथे पाठवून अभ्यास करायला सांगितले.

आतापर्यंत 30 टक्के पायाभूत सुविधांचे काम आम्ही केले आहे. उर्वरित काम लवकरच करू.’ प्रभारी प्राचार्य प्रमोद मुळे म्हणाले, ’ओडिशामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे आयटीआय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, प्रात्यक्षिके, शासनाचे मोबाईल अ‍ॅप, महिलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम, बेकर्स अभ्यासक्रम असे अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर पालिका आयटीआयमध्येही बदल केला जाईल.’

हे ही वाचा : 

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक 12 दिवस रात्री तीन तास बंद

पुणे : आरटीई प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 7 जुलैची मुदत

Back to top button