पुणे : चांदणी चौकातील वाहतूक 12 दिवस रात्री तीन तास बंद | पुढारी

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक 12 दिवस रात्री तीन तास बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चांदणी चौकातील पुलाच्या गर्डर उभारणीसाठी 4 ते 15 जुलै या कालावधीत रोज रात्री 12.30 ते पहाटे 3.30 पर्यंत कात्रज ते देहूरोड रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक वळविण्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. बैठकीला पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, एनएचएआयचे संचालक संजय कदम उपस्थित होते.

नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मल्टी एक्सेल वाहनांची वाहतूक 3 तासांसाठी बंद केली जाणार आहे. ही वाहने मुंबई एक्स्प्रेस-वे, तळेगाव टोल नाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणी थांबवली जातील व सातार्‍याकडून येणारी वाहने खेड-शिवापूर टोलनाका येथे थांबवली जाणार आहेत.

 

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी या मार्गावरील वाहतूक रात्रीच्यावेळी बंद केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करावे.
                                             – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.

वाहतूक बंद कालावधीमध्ये मुख्य महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रकचालकांना दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्याचा वापर करता येईल. मुंबईकडून सातारा/ कोथरूडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सेवा रस्ता व रॅम्प – 6 चा वापर करावा लागणार आहे. तसेच सातारा व कोथरूड (पुणे शहर) मार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प-8 चा वापर करावा.
                                         – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय. 

हे ही वाचा : 

श्री विठ्ठलाची मुखदर्शन रांग एक किलोमीटर लांब

Ashadhi Ekadashi : हरिनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी

 

Back to top button