Ashadhi Ekadashi : हरिनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी | पुढारी

Ashadhi Ekadashi : हरिनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी

पंढरपूर; सुरेश गायकवाड :  ‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा गुरुवारी (दि. 29) भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या पंढरपूर येथे दाखल झाल्यामुळे 12 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

भाविकांच्या दाटीमुळे पंढरीनगरी दुमदुमली आहे. पावसाने ओढ दिली असली तरी राज्यभरातून व परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक गुरुवारी पहाटे 2.20 ते 4.30 वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असते. त्यामुळे या यात्रेनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मुख्यमंत्री आजच (बुधवारी) पंढरीत दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या मजल दरमजल करत लाखो भाविकांसह बुधवारी रात्री पंढरीत दाखल झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे वाखरी येथील शेवटचे उभे रिंगण मंगळवारी दुपारी संपल्यानंतर पालख्या वाखरी मुक्कामी थांबल्या तर बुधवारी दुपारी पंढरपूरच्या वेशीवर विसावा मंदिर इसबावी येथे दाखल झाल्या. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी आदींनी पालख्यांचे स्वागत केले.

माऊली-तुकोबांची पालखी पंढरपुरात दाखल होताच पंढरपूरकरांनी फुले उधळत स्वागत केले. दरम्यान, यात्रेकरिता आलेल्या भाविकानी चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसर, दर्शन रांग व उपनगरीय भाग गजबजला आहे. दर्शन रांगेत 2 लाखांवर भाविक उपस्थित आहेत. एका मिनिटाला साधारणपणे 40 भाविकांना दर्शन मिळत आहे. दर्शनासाठी जवळपास 7 ते 8 तासांचा कालावधी लागत आहे.

चंद्रभाग नदीत मुबलक पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. 8 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. 300 हून अधिक सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्या वतीने आरोग्य विषयक सेवा बजावण्यात येत आहे.

दर्शनासाठी आठ तास

भाविक पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असतात. दर्शन रांग मंदिरापासून पुढे सारडा भवन, पत्राशेड संपवून पुढे गेली आहे. एकूण दहा दर्शन शेड भरून दर्शन रांग गोपाळपूरच्या दिशेने पुढे गेली आहे. दर्शन रांग वॉटरप्रूफ असल्याने भाविकांना पावसाचा त्रास होणार नाही. बुधवारी दर्शनासाठी 7 ते 8 तासांचा कालावधी लागत असल्याचे परभणी येथील भाविक महादेव पडदुणे यांनी सांगितले.

Back to top button