महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रगती कौतुकास्पद : वासवान केरळ | पुढारी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रगती कौतुकास्पद : वासवान केरळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रगती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वगार केरळचे सहकारमंत्री व्ही.एन. वासवान यांनी काढले. तसेच केरळमधील सहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरील महाराष्ट्र सरकारबरोबरची संयुक्त चर्चा आणि अभ्यासदौरा यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. केरळचे सहकारमंत्री वासवान यांच्या नेतृत्वाखाली 25 सदस्यीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस भेट नुकतीच भेट दिली.

या वेळी केरळ सहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवर चर्चा करण्यात आली. या वेळी तेथील विविध पक्षांच्या 10 आमदारांसह अधिकार्‍यांसह एकूण 25 सदस्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या अभ्यासदौर्‍यावर आले होते. या वेळी राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार अपर निबंधक शैलेश कोतमिरे, पणन संचालक विनायक कोकरे आदी उपस्थित होते.

केरळ सरकारने नुकतेच देशात प्रथमच राज्यातील 14 जिल्हा बँकांचे विलिनीकरण स्वतःच्या राज्य बँकेत करून देशपातळीवरील सध्याच्या सहकारी पतसंरचनेच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये बदल करून ती द्विस्तरीय करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने नुकतीच त्यांच्या सहकार कायद्यात तिसरी सुधारणा प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित सुधारणांवर या भेटीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या वेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी राज्य बँकेच्या प्रगतीचे सादरीकरण करीत केरळच्या सहकार कायद्यातील प्रस्तावित तरतुदींमध्ये आवश्यक ते बदल सुचविले. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्यातील विविध तरतुदींचे विश्लेषण केले. राज्य बँकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी आभार मानले.

हेही वाचा

मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

पुण्यात घराचे छत कोसळून प्रौढाचा मृत्यू

सांगली : लेखापरीक्षणातील 62 कोटींची वसुली रखडली

Back to top button