

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत, जे लोक पराभूत झाले आहेत, त्यांना विकासकामांसाठी निधी देता आणि लाखो लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना निधी देत नाही, निधी देणार नसाल तर जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीडीसी) बैठकीला येऊन उपयोग काय, असा सवाल महाविकास आघाडीच्या आमदारांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना सोमवारी केला. लोकप्रतिनिधींना निधी दिला जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
विरोधी पक्षाच्या आमदारांना योग्य पद्धतीने निधी देत नाही, अशी तक्रार आहे. याबाबत बैठक घ्यावी अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यावरती सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री केसरकर यांनी बैठक घेतली. राज्यस्तरावरच निधी वाटपाचा फॉम्युर्ला ठरल्याचे केसरकर यांनी सांगितले.
आम्ही लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आहोत, निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने कार्यवाही करा. जर निधी मिळणार नसेल तर आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला येऊन काय उपयोग आहे का? त्यावर निधीचे योग्य पद्धतीने वाटप केले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते, आ. सतेज पाटील, खा. धैर्यशील माने, आ. हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगांवकर आदी उपस्थित होते.