पुण्यात पाऊस कमी, खड्डे-कोंडी फार ! रस्ते दुरुस्तीच्या दाव्याची पहिल्याच पावसात पोलखोल | पुढारी

पुण्यात पाऊस कमी, खड्डे-कोंडी फार ! रस्ते दुरुस्तीच्या दाव्याची पहिल्याच पावसात पोलखोल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाले, चेंबर, पावसाळी लाइन सफाई केल्याच, तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसाने प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली आहे. पाऊस कमी असतानाही रस्त्यावर जागोजागी पाणी साचून वाहतूक कोंडी होऊन सर्वत्र दाणादाण उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारी शहर व परिसरात दमदार हजेरी लावली.

या पावसामुळे प्रशासनासह नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामे झाल्याचा दावा केला जात असला, तरी रस्त्यांवर जागोजागी साचलेल्या पाण्याने प्रशासनाचा तो दावा किती फोल आहे, ते दिसून आले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दोन दिवस शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, महात्मा फुले पेठ, मार्केट यार्ड, शिवाजी रस्ता, केळकर रस्ता, डेक्कन, बिबवेवाडी रस्ता, सदाशिव पेठेतील साने गुरुजीनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, स्वारगेट यांसह शहरातील पेठा, उपनगरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

रस्ते झाले जलमय…

अनेक ठिकाणी चेंबर, सांडपाणी, मैलापाणी वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी वाहून जाऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चेंबरमधून रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहनचालक, पादचार्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

अतिरिक्त आयुक्तांचा सज्जड दम

शहरात पावसाचे पाणी साचलेले दिसल्यास आपल्या विभागाची जबाबदारी नाही, असे म्हणून दुर्लक्ष करू नका. तातडीने संबंधित विभागाला किंवा तेथील क्षेत्रीय कार्यालयांना कळवा. पाहूनही दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्‍यावर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला. पहिल्याच पावसाळ्यात शहरात पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर बिनवडे यांनी सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही केल्या.

हेही वाचा

पुण्यात आगामी सहा दिवस मुसळधार पाऊस

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांचा होणार सत्कार

Back to top button