पुणे: धोकादायक वीज जोडांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला | पुढारी

पुणे: धोकादायक वीज जोडांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला

पौड रोड (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पौड रोडवरील किष्किंधानगर, जय भवानी, राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) आणि भुसारी कॉलनी सोसायटी भागात महावितरण कंपनीकडून विजेच्या खांबांवरून नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वीजजोड देण्यात आले आहेत. यामुळे परिसरात खांबांवर वीज केबलचे धोकादायक जाळे तयार झाले असून, सतत शॉट सर्किटच्या घटना घडत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

भुसारी कॉलनीत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागण्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पावसाळा सुरू झाल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत शाॅट सर्किटमुळे आगीच्या घटना घडत आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान देखील होत आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोला, असे त्यांनी सांगितले.

पौड रोड परिसरातील जय भवानी, राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा), किष्किंधानगर या दाट वस्तीच्या भागात ठराविक ठिकाणी विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत. मात्र, काही भागांत एकाच खांबावरून अनेक वीजजोड दिल्यामुळे त्या ठिकाणी केबलचे धोकादायक जाळे तयार झाले आहे. पावसाळा सुरू झाल्याने शाॅट सर्किटच्या घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने उपायोजना करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

हेही वाचा:

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा, ३० जून पर्यंत देशात सर्वत्र जोरदार पाऊस

पुणे: रिंगरोडच्या भूसंपादनाला गती द्या : जिल्हाधिकारी

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसर्‍या, चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार

 

Back to top button