कडूस (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणात केवळ 7.55 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतील शेतकरी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जर पावसाने अशीच दडी मारल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. परिणामी, या वर्षी धरणात मृतसाठा शिल्लक राहण्याची परिस्थिती ओढावते की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषतः सह्याद्रीच्या डोंगररांगावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे चासकमान धरण जुलैअखेर 100 टक्के भरत असते. यामुळे खेड तालुक्यातील कालव्याअंतर्गत व भीमा नदीअंतर्गत असणार्या शेतकरी बांधवांचा काहीसा पाणीप्रश्न मिटत असतो. परंतु या वर्षी सलग मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडले गेल्यामुळे धरणांतर्गत असणार्या शेतकर्यांची पिके संकटात सापडली आहेत.
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणांतर्गत व भीमा नदीअंतर्गत असलेल्या शेतकर्यांना आपल्या शेतात उभी असलेली पिके जगविण्यासाठी लांबच लांब पाइप टाकून धडपड करावी लागत आहे. सध्या चासकमान धरणात 7.55 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, पाणीपातळी 631.36 मीटर, तर एकूण साठा 43.39 दशलक्ष घनमीटर, तर उपयुक्त साठा 16.20 घनमीटर आहे. तर 1 जूनपासून धरणाच्या साखळीत फक्त एकूण 8 मिलीमीटर, तर मागील 24 तासांत 6 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मागील वर्षी याच तारखेला चासकमान धरणात 7.50 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. पाणीपातळी 631.34 मीटर, तर एकूण साठा 43.29 दशलक्ष घनमीटर होता. तर उपयुक्त साठा 16.10 घनमीटर होता, तर 1 जूनपासून 76 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता.
हे ही वाचा :