पुणे : पाच महिन्यांत 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त | पुढारी

पुणे : पाच महिन्यांत 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त

महेंद्र कांबळे : 

पुणे : शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती यामुळे मुंबईपाठोपाठ अमली पदार्थ तस्करांचे पुणे हे लक्ष्य आहे. मात्र, असे असतानाच अमली पदार्थ तस्कारांना पुणे पोलिसांनी कारवाईने चोख उत्तर दिले आहे.

26 जून हा जागतिक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा केला जात आहे. 2047 पर्यंत भारत देश हा अमली पदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. दीड वर्षात पोलिसांनी तब्बल 14 कोटी 8 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तर 2019 ते 2021 या तीन वर्षांत पुणे पोलिसांनी 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. मागील दहा वर्षांच्या तुलनेत पाच महिन्यांत सर्वाधिक म्हणजे 7 कोटी 24 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. साडेपाच वर्षांत 22 कोटी 17 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी होत होती. आता हरियाणा आणि मध्यप्रदेश येथूनदेखील पुण्यात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे कारवायांवरून समोर आले आहे. शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये अमली पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना पकडलेदेखील गेले आहेत.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेऊन मागील दीड वर्षात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मागील दहा वर्षांत जेवढी कारवाई करण्यात आली होती तेवढी मागील दीड वर्षांच्या काळात करण्यात आली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. जनजागृती, समुपदेशन आणि अमली पदार्थ तस्करांविरुद्ध परिणामकारक कारवाई अशी त्रिसूत्री हाती घेण्यात आली आहे. तसेच रेकॉर्डवरील आरोपींविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
                               – रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 

नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर
पुणे शहरात अमलीपदार्थांची तस्करी करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर असल्याचे दिसून येते. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी ते पुण्यात करतात. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजेवाडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्याची ग्राहकांना विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.

हे ही वाचा : 

पुणे : उरुळी देवाची येथील गोदाम खाक

बारामतीत पोलीस व सराफाविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

 

 

Back to top button