पिंपरी : यंदापासून ‘डीबीटी’च्या अंमलबजावणीस सुरुवात; अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार जमा

पिंपरी : यंदापासून ‘डीबीटी’च्या अंमलबजावणीस सुरुवात; अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार जमा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष 2023 – 24 पासून पिंपरी चिंचवड महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात सेवा पुरविण्याऐवजी त्या वस्तूंची बाजारभावाप्रमाणे असणारी किंमत त्यांना थेट हस्तांतरीत (डीबीटी) करण्याची योजना लागू करण्यात येत आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना थेट लाभ पोहचविण्यासाठी शालेय साहित्य खरेदीसाठी डीबीटीव्दारे इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी तील विद्यार्थ्यांना सरासरी 3,500 आणि इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना 3 हजार 700 रुपये इतकी रक्कम बँक खात्यात जमा करायची आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील 4 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीची रक्कम जमा झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी विविध शालेय साहित्य देण्यात येते. राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू रुपात मिळणार्‍या लाभाचे हस्तांतर, आता रोख थेट लाभार्थींच्या बँक खात्यात करण्याचे आदेश दिले असतानादेखील आत्तापर्यंत निविदाप्रक्रिया राबविली जात होती. त्याकरिता दप्तर, शूज-मोजे, वह्या, टॅब, व्यवसायमाला पुस्तके यासह अन्य शालेय साहित्य खरेदीचे प्रस्तावावर मान्यता घेऊन शिक्षण विभागातून शालेय साहित्यावर करोडो रुपये खर्च केला जात होता. त्यानंतर यावर्षीपासून डीबीटी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

जे विद्यार्थी शालेय साहित्य अनुदानाची रक्कम घेऊन शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी करीत आहेत. त्यांच्या अनुदानाची रक्कम वसुलात आणावी. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे बँक खाते क्रमांक कार्यालयात बिनचूकपणे कळविण्यात यावे. याबाबत समितीने दक्षता घ्यायची आहे.

रकमेच्या खातरजमासाठी शालेय स्तरावर समिती

विद्यार्थ्यांनी डीबीटी रकमेतून शालेय साहित्य खरेदी केल्याची शाहनिशा आणि तपासणी करण्यासाठी प्रत्येक शालेय स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. शिक्षक समितीने विद्यार्थ्यांनी सर्व शालेय साहित्य खरेदी केल्याची खातरजमा करावी. विद्यार्थ्यांनी खरेदी केलेली शालेय साहित्य बिले, शालेय साहित्य उत्तम दर्जाचे असल्याची तपासणी करून समितीने तसा लेखी अहवाल मुख्य कार्यालयाकडे सादर करावा. जे विद्यार्थी साहित्य खरेदी करणार नाही त्यांचा अहवाल स्वतंत्र करावा. त्यांना अदा केलेल्या अनुदानाची रक्कम वसूल करणेबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

जमा झालेल्या रकमेतून घ्यायचे साहित्य

शालेय दप्तर (सॅक), शालेय बूट व मोजे, पीटी बूट व मोजे, कंपास पेटी, फूटपट्टी, वॉटर बॉटल, व्यवसायमाला, प्रयोगवही, चित्रकलावही, भूगोल, नकाशा वही, शालेय वह्या, रेनकोट

पहिल्या टप्प्यात 4 हजार 300 विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिली आहे. पुढील विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा होईल.

– विजयकुमार थोरात,
सहाय्यक आयुक्त

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news