पुणे महापालिकेची अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई थंडावली

पुणे महापालिकेची अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई थंडावली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंगवर सुरू केलेली कारवाई पुन्हा थंडावली आहे. जून महिन्यातील पहिल्या वीस दिवसांत केवळ 50 होर्डिंगवर कारवाई झाल्याचे पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे होर्डिंगवर कारवाई न करणार्‍या सहायक आयुक्तांवर 'कारणे दाखवा' नोटीस बजावून कारवाई करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात वादळी वार्‍यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून दोन जणांना जीव गमवावा लागला होता.

या घटनेनंतर सर्वच ठिकाणच्या अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावर कारवाईची मोहीम पालिका प्रशासनाने एप्रिल-मे महिन्यात सुरू केली होती. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला क्रेन, गॅस कटरसह अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. 30 मेपर्यंत सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ते काढून टाकण्यात यावेत असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत हे टार्गेट पूर्ण झालेले नाहीत.

महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण 2 हजार 214 अनधिकृत होर्डिंग होते, त्यामधील 1 हजार 247 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. 31 मे अखेर 947 अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई शिल्लक होती. जून महिन्यात त्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, या महिन्यात कारवाईचा वेग थंडावला. आकाशचिन्ह परवाना विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 1जून ते 20 जून या कालावधीत केवळ 51 होर्डिंग काढण्यात आले आहेत. म्हणजेच जवळपास नऊशे अनधिकृत होर्डिगवर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही कारवाई जाणीवपूर्वक थंडावली नाही ना अशीही चर्चा सुरू झाली आहे.

जून महिन्यात अनधिकृत होर्डिंगवर कमी प्रमाणात कारवाई झाली आहे. आकडेवारीनुसार एक-दोन होर्डिंग दिवसभरात काढले जात आहेत. कारवाई वाढविण्याची सूचना देऊनही कारवाई न करणार्‍या सहायक आयुक्तांना पुन्हा एकदा 'कारणे दाखवा' नोटीस बजावली जाईल. समाधानकारक खुलासा नसलेल्यांवर पुढील कारवाई केली जाईल.
                            – माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग 

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news