पिंपरी : अचानक बदलीमुळे ‘सेटिंग’ बिघडले; पालिकेचे अनेक अधिकारी नाराज | पुढारी

पिंपरी : अचानक बदलीमुळे ‘सेटिंग’ बिघडले; पालिकेचे अनेक अधिकारी नाराज

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या सतत बदल्या होत आहेत. अचानक विभाग बदलल्याने ‘सेटिंग’ बिघडत आहे. विभागाच्या कामासाठी देवाण-घेवाणीचा ठरलेला ‘मलिदा’ नेमलेल्या व्यक्तीकडून मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे अधिकारी वर्ग खासगीत संताप व्यक्त करीत आहे. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहायक आयुक्त व क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या.

त्यानंतर, आयुक्त शेखर सिंह यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त अशा 18 अधिकार्‍यांच्या 13 एप्रिल 2023 ला अचानक बदल्या केल्या. या बदल्या बर्‍याच गाजल्या. नवख्या व अनुभव नसलेल्या अधिकार्‍यांवर महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, अनुभवी अधिकार्‍यांना दुय्यम दर्जाचे विभाग सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गात खदखद सुरू आहे.

या बदल्यानंतर केवळ दीड महिन्यात आरोग्य, समाज विकास, आकाशचिन्ह व परवाना, भूमि आणि जिंदगी या विभागाचे अधिकारी आणि ‘ह’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी बदलण्यात आले आहेत. वारंवार विभाग बदलण्यात येत असल्याने काम करता येत नाही. नव्या विभागाचा कारभार समजून घेण्यात दोन ते तीन महिने निघून जातात. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजाचा खोळंबा होत आहे. मुदत संपण्यापूर्वीच अचानक बदली होत असल्याने अधिकारी नाराज आहेत. खासगीत ते संताप व्यक्त करीत आहेत.

नियमानुसार बदल्यांबाबत कार्यवाही

नियमानुसार एका विभागात तीन किंवा सहा वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुसर्‍या विभागात बदली केले जाते. त्यासाठी पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली केली जाईल. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

अधिकारी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले

क्षमता असूनही मर्जीचा विभाग न मिळाल्याने नाराज अधिकारी गैरहजर राहत आहे. असे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजाचा खोळंबा होत आहे. असे पाच ते सहा अधिकारी अनेक दिवसांपासून रजेवर होते. त्यातील दोन अधिकार्‍यांनी दुसर्‍या ठिकाणी बदली करून घेतली आहे. अशा अधिकार्‍यांवर कारवाई केली जात नसल्याने चित्र आहे.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं सराटीमध्ये स्वागत

Adani Hindenburg Row : अदानी समुहाच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घसरण; अमेरिकेतील गुंतवणूकदारांची चौकशी

Back to top button