Ashadhi Wari 2023 : तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं सराटीमध्ये स्वागत | पुढारी

Ashadhi Wari 2023 : तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं सराटीमध्ये स्वागत

राजेंद्र कवडे देशमुख : 

बावडा : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा बावडा येथील दुपारचा मुक्काम संपवून निरा नदीकाठी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी शुक्रवारी (दि. 23) रात्री 7.15 वाजता पोहचला. पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असून, निरा नदी ओलांडून पालखी सोहळा शनिवारी (दि. 24) सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
बावडा येथील दुपारचा मुक्काम संपवून 5 वाजता पालखीने सराटीकडे प्रस्थान ठेवले. बावडा येथून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या सराटी येथे पालखी सोहळा रात्री दाखल झाला.

सराटी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व रथापुढे घागरीतून जल ओतून पालखीचे स्वागत केले. या वेळी गावच्या वेशीवर स्वागत करण्यासाठी उपसरपंच संतोष कोकाटे, हनुमंतराव कोकाटे, बापू कोकाटे, राजेंद्र कुरळे, लालासाहेब काटे, अण्णा कोकाटे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, स्वप्निल जगदाळे आदींसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या वेशीपासून ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी तळावर आणली. सराटी येथे पादुकांचा शनिवारी (दि. 24) सकाळी निरा स्नान विधी होऊन पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल व फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकलूज शहरात मुक्कामासाठी दाखल होईल.

वारकर्‍यांना प्रखर उन्हाचा त्रास

जून महिना असूनही तीव्र ऊन असल्याने व दुसर्‍या बाजूला पालखीच्या कामामुळे वृक्षतोड करण्यात आल्याने प्रवासादरम्यान वारकर्‍यांना उन्हाचा त्रास होत आहे. विशेष करून महिलांना अधिक त्रास जाणवत आहे. उन्हामुळे अनेक महिलांना चक्कर येण्याच्या अनेक घटना घडल्याचे दिसून आले.

हे ही वाचा : 

Pujara Cheteshwar Pujara : कसोटी चॅम्पियनशिपच्या अपयशाचे खापर पुजाराच्या डोक्यावर

राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे अन् फडणवीस

Back to top button