द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम बंद ! | पुढारी

द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम बंद !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत अकरावीपासून असलेले द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहेत. त्याऐवजी राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे दर्शविण्यात आलेले नवीन अभ्यासक्रम 2024-25 पासून सुरू करण्यात येणार आहेत. डॉ. कोठारी आयोगाच्या 1964 च्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने 1978-79 पासून राज्यात द्विस्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत तांत्रिक, वाणिज्य, कृषी व मत्स्य, या 4 गटांतील एकूण 16 द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, हे अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून, ते राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याशी सुसंगत नाहीत. परिणामी, मुलांना रोजगार-स्वयंरोजगार व उच्च शिक्षणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

बदलते तंत्रज्ञान व शैक्षणिक दर्जा उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेम वर्क’ विकसित केले आहे. त्याअंतर्गत नवीन अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली आहेत. नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक तुकडीची प्रवेशक्षमता 50 राहणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक कर्मचारी व सुविधा निर्माण करणे महाविद्यालयास बंधनकारक राहणार आहे. याबाबतची कार्यप्रणाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक निश्चित करणार आहेत. परीक्षांचे नियोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येणार आहे.

जुन्या शिक्षकांना प्रशिक्षण
नवे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सध्याच्याच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन शिक्षकांची नियुक्ती करताना संबंधित शिक्षकाने नवीन अभ्यासक्रमाकरिता निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे.

हे ही वाचा : 

मराठा समाजाचा पक्ष ही ओळख पुसण्याची गरज : छगन भुजबळ

Manipur Violence : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक; मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा होणार

Back to top button