Manipur Violence : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक; मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा होणार | पुढारी

Manipur Violence : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक; मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून निर्माण झालेल्या हिंसाचार आणि तणावाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय गृहमंत्रालयाने ही बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी अनेक दिवसांपासून विरोधकांकडून केली जात होती.

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी पुन्हा एकदा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. लष्करही प्रत्युत्तर देत आहे. भारतीय लष्कराच्या स्पिअर कॉर्प्सने ही माहिती दिली. हल्लेखोरांनी इंम्फाळ पूर्वेकडील उरंगपत/येंगंगपोकपी (YKPI) आणि कांगपोकपी भागात गोळीबार केला. YKPI कडून टेकडीच्या दिशेने सशस्त्र हल्लेखोरांचा एक गट परिसरात घुसला. त्यांनी उरंगपत आणि ग्वालताबी गावांच्या दिशेने स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. महिला आंदोलकांचा मोठा गट या भागात अतिरिक्त सैन्याच्या हालचालीत अडथळा आणत आहे. सशस्त्र हल्लेखोरांना रोखण्यासाठी लष्कराने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 नाकेबंदी केली आहे.

आतापर्यंत 1,095 शस्त्रे जप्त

शांतता प्रस्थापित करण्यासाठी शुक्रवारी अनेक जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरूच होती. सुरक्षा दलांच्या संयुक्त शोध मोहिमेत आतापर्यंत एकूण 1,095 शस्त्रे, 13,702 दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, पोलीस आणि केंद्रीय दले लवकरच एसओओ गट आणि करारांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व सशस्त्र गटांविरुद्ध संयुक्त कारवाई सुरू करतील.

हेही वाचा : 

Back to top button