

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सैन्य दलात अधिकारी असल्याचे सांगून तरुणांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळणा-या तोतया लष्करी अधिकार्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 2 ने बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुन्हे शाखा व मिलिटरी इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. त्याने तरुणांना भरती झाल्याबाबतची बनावट मेरीट लिस्ट पाठवून त्यांच्याकडून एकूण 28 लाख 88 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रमोद भीमराव यादव (रा. अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तोतया अधिका-याचे नाव आहे.
त्याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात 16 लाखांची फसवणूक, बलात्कार, अनैसर्गिक कृत्यप्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्याने चार लग्न केल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे. प्रमोद यादवचे वडील हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. तो लष्करात भरती होऊ शकत नसल्याने घरच्यांना अंधारात ठेवून लष्करात भरती झाल्याचे दाखवत होता. त्याच जोरावर त्याने सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवत तरुणांना लष्करात नोकरी लावण्याचे स्वप्न दाखवले होते.
त्यासाठी त्याने लाखो रुपयांच्या रकमा उकळल्याची माहिती सदर्न कमांड येथील आर्मी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार खंडणीविरोधी पथक 2 चे पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणावरून प्रमोद यादव हा सांगोला-जत या ठिकाणी असल्याचे कळाल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेऊन कोंढव्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे , सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे 2. सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलिस अंमलदार विजय गुरव, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर व आर्मी इंटेलिजन्स यांनी केली.
यादव याने तेरा तरुणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्या खात्यांबाबत माहिती मिळवली असता त्याने 46 लाखांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
– अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.
हे ही वाचा :