भंगारवाल्याने दान केले 35 लाख! | पुढारी

भंगारवाल्याने दान केले 35 लाख!

कॅथल : हरियाणातील फकीर चंद या भंगारवाल्याने आतापर्यंत 35 लाख रुपयांचा दानधर्म केला असून आपल्या कमाईतील 90 टक्के वाटा दान करण्यावर त्यांचा भर असतो. फकीर चंद 53 वर्षांचे असून मागील 25 वर्षांपासून ते या भंगाराच्या व्यवसायात आहेत. आता इतका दानधर्म करणारे फकीर चंद केवळ एका खोलीच्या घरात राहतात, हे आणखी आश्चर्याचे आहे. त्यांचे पाच बहीण-भाऊ आहेत. मात्र, ते परिवारात एकटे आहेत. फकीर चंद यांनी स्वत:कडील 11 लाख रुपये व भावा-बहिणीच्या मृत्यूनंतर त्यांच्या बचतीचे 24 लाख रुपये देखील दान केले आहेत. ते जिथे जातात, त्यांना त्यांच्या पेहरावावरून वागवले जात नाही. उलटपक्षी, दानी सज्जन म्हणून त्यांचा विशेष गौरव केला जातो.

वास्तविक, भावा-बहिणीची संपत्ती घेऊन ते आपले आयुष्य आरामात जगू शकले असते; पण त्याऐवजी त्यांनी मेहनतीवर भर देणे पसंत केले. मेहनतीमुळे शरीर तंदुरुस्त राहते, यावर त्यांचा विश्वास आहे. फकीर चंद यांची रोजची कमाई 700 ते 800 रुपये असून 150 ते 200 रुपये सोडून उर्वरित सर्व पैसे ते दान करून टाकतात. त्यांनी आतापर्यंत पाच गरीब कन्यांचा विवाह करून दिला असून धर्मशाळा, कुरुक्षेत्र, विविध वृद्धाश्रम, शेडसाठी त्यांनी 12 ते 13 लाख रुपये दान केले आहेत. दानधर्म करण्यासाठी श्रीमंतीची गरज नसते, हेच फकीर चंद दाखवून देत आले असून आपल्या आवश्यकतेनुरूप पैसा ठेवून बाकी पैसे दान करायला हवेत, असा संदेश ते सर्वांना देत आले आहेत.

Back to top button