पुणे : दिवेकर कुटुंबीयांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप | पुढारी

पुणे : दिवेकर कुटुंबीयांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

खोर  : पुढारी वृत्तसेवा :  वरवंड (ता. दौंड) येथे अतिशय मन हेलावून टाकणारी घटना मंगळवारी (दि. 20) घडली. येथील गंगासागर पार्कमध्ये रूम नं. 201 मध्ये राहत असलेल्या दिवेकर कुटुंबीयांनी काही क्षणात अख्खे कुटुंब संपविल्याने संपूर्ण वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी (दि. 21) डॉ. अतुल दिवेकर (वय 39), पत्नी पल्लवी (वय 35), मुलगा अद्वित (वय 10), तर मुलगी वेदांतिका (वय 6) यांच्यावर वरवंड येथील स्मशानभूमीत रात्री 9:25 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकर्‍यांनी साश्रूनयनांनी या चौघांना अखेरचा निरोप दिला. मंगळवारी सकाळच्या सुमारास डॉ. अतुल दिवेकर व त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात काही कौटुंबिक वाद झाला होता.

त्यामुळे त्यांनी सकाळीच पत्नीला गळा आवळून ठार मारले. त्यानंतर दोन्ही मुलांना गणेशवाडी, वरवंड येथील उसाच्या शेतात असलेल्या विहिरीत ढकलून त्यांचादेखील खून केला आणि शेवटी घरी येऊन डॉ. अतुल यांनी बेडरूममध्ये पंख्याला फाशी घेतली. या वेळी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये मी कौटुंबिक वादला कंटाळून आत्महत्या करीत असून, यामध्ये कोणाला दोषी धरू नये, असा स्पष्ट उल्लेख आहे. दरम्यान, मुलांना ज्या विहिरीत ढकलले ती काठोकाठ 10 परस पाण्याने भरली असल्याने मुले बाहेर काढण्यास मोठी अडचण येत होती. जवळपास 3 मोटारींच्या साहाय्याने विहिरीचे पाणी उपसण्यात आले. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून व रेस्क्यू टीमच्या साहाय्याने रात्री 8.30 वाजता मुलगी वेदांतिका हिचा मृतदेह मिळाला, तर रात्री 10.40 वाजता मुलगा अद्वित याचा मृतदेह मिळाला.

सर्व दिवेकर कुटुंबीय शवविच्छेदन करण्यासाठी यवत येथील सरकारी रुग्णालयातून पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. या वेळी रात्री 12 वाजता अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगासागर पार्कमध्ये ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याठिकाणी श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी घेण्यात आली. या वेळी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, केशव वाबळे उपस्थित होते. बुधवारी रात्री 9:25 वाजता या चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी लहान मुलांना पाहून उपस्थित ग्रामस्थांचे मन पिळून निघाले. असंख्य लोकांच्या डोळ्यांतून अश्रूंचे बांध फुटले होते.

Back to top button