

वडगाव शेरी : पुणे-नगर महामार्गावर सर्व्हिस रोड नसल्याने वाहनचालकांना पन्नास मीटर जाण्यासाठी चार किमीचा वळसा घालून यावे लागत आहे. हा वळसा टाळण्यासाठी अनेकदा वाहनचालक रस्त्याच्या विरुध्द बाजूने वाहन चालवतात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे.
नगर रोडवर सर्व्हिस रोड करावा, यासाठी अनेक वर्षांपासून नागरिकांनी वाहतूक विभाग आणि पथ विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. अधिकार्यांनी रस्त्याची पाहणी केली. मात्र, त्यानंतर वाहतूक विभाग आणि पालिका यांच्या लाल फितीच्या कारभारात सर्व्हिस रोड अडकला आहे.
पुणे-नगर महामार्गावर बीआरटी करताना रस्त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड करण्याचे नियोजन होते. मात्र, पालिकेला मबीआरटीफ पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रस्ता करण्याचा विसर पडला. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील नियोजित सर्व्हिस रोडच्या जागेवर पथारीवाले, गाडी विक्रेते आणि व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. बीआरर्टी मार्ग करताना दाट लोकसंख्या असणार्या भागात नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग ठेवला नाही. यामुळे नागरिकांना पन्नास मीटर जाण्यासाठी चार किमीचा वळसा घालावा लागत आहे. हा वळसा टाळण्यासाठी वाहनचालक विरुध्द बाजूने वाहने नेतात. नगर रोडवरील मातृछाया सोसायटी ही सिग्नलपासून दहा मीटरवरच आहे. पण, तिकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिक विरुध्द बाजूने येतात. याचप्रमाणे उत्तम टॉवर आणि त्या भागातील अनेक सोसायट्यांना शंभर मीटर रस्ता ओलांडण्यासाठी चार किमी जावे लागते. रामवाडी गावातील नागरिकांना वडगाव शेरीला जाण्यासाठी पालिकेने सर्व्हिस रस्ता केला नाही. विमाननगरवरून वैकफिल्ड वस्ती, विमानतळ पोलिस स्टेशन या भागांत जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता केला नाही. पाचवा मैल ते टाटा गार्डन या रस्त्यावर सर्व्हिस रस्ता नाही. खुळेवाडी, लोहगावातून फॉरेस्ट पार्क मार्गातून नगर रोडला येणार्या नागरिकांसाठी सर्व्हिस रस्ता नाही. सर्व्हिस रस्ता किंवा पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना वेळ वाचविण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी विरुध्द बाजूने प्रवास करावा लागत आहे.
नगर रोडवर सर्व्हिस रस्ता करावा, यासाठी नागरिकांनी पालिका आणि वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला होता. वाहतूक विभागाचे अधिकारी आणि पालिकेच्या अधिकार्यांनी रस्त्याची पाहणी केली होती. त्या वेळी अधिकार्यांना सर्व्हिस रोडबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन वर्षभरापूर्वी दिले होते. पण, पालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने अद्याप सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू झाले नाही. यामुळे नगर रोडवर वाहतूक कोंडी, अपघात आणि इतर समस्या भेडसावत आहेत.
या ठिकाणी सर्व्हिस रोडची गरज
1) रामवाडी गाव ते छत्रपती संभाजी महाराज चौक, 2) रामवाडी वेकफिल्डवस्ती ते छत्रपती संभाजी महाराज चौक, 3) पाचवा मैल ते टाटा गार्डन, 4) फॉरेस्ट पार्क ते खराडी दर्गा, 5) तुळजा भवानीनगर ते खराडी दर्गा, 6) मातृछाया सोसायटी, 7) उत्तम टॉवर ते शास्त्रीनगर चौक, 8) शास्त्रीनगर मातृछाया सोसायटी ते दास शोरूम
नगर रोडला सर्व्हिस रोड करण्याचे नियोजन सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे सर्व्हिस रोडचे नियोजन राहिले होते. वाहतूक पोलिसांनी काही भागांमध्ये सर्व्हिस रोड केल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते, असे सांगितले होते. पण, आता लवकरच सर्व विभागांची बैठक घेऊन सर्व्हिस रोड करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
– संजय धारव, कार्यकारी अभियंता, पथ विभाग
हे ही वाचा :