पुणे : कीटकनाशक प्राशन केलेल्या चिमुरड्याचे वाचले प्राण ! ससूनमधील डॉक्टरांना यश | पुढारी

पुणे : कीटकनाशक प्राशन केलेल्या चिमुरड्याचे वाचले प्राण ! ससूनमधील डॉक्टरांना यश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुळशी तालुक्यात दीड वर्षाच्या अरविंद नावाच्या चिमुरड्याने शेतात खेळत असताना ऑर्गेनोफॉस्फरस या कीटकनाशकाचे सेवन केले. अत्यवस्थ झालेल्या अरविंदला आधी घराजवळच्या रुग्णालयात आणि तिथून ससून रुग्णालयात आणण्यात आले. ससूनमधील डॉक्टरांच्या टीमने अरविंदचे प्राण वाचवले. अरविंद जाधव याचे आई-वडील सीता आणि राणू जाधव शेतमजूर म्हणून काम करतात. पालक शेतात काम करत असताना अरविंद बाजूला खेळत होता. त्याने खेळता-खेळता तेथील कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावली.

बाळाच्या तोंडातून फेस येऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात आणले. ससूनमधील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. अरविंदवर ससूनच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नरेश सोनकवडे, डॉ. शलाका पाटील, डॉ. गोकूळ पावसकर या डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. डॉक्टरांनी सुरुवातीला पोटातील कीटकनाशक बाहेर काढले. त्यानंतर बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तब्बल 23 दिवसांच्या उपचारानंतर अरविंद पूर्णपणे बरा झाला असून, त्याला घरी सोडण्यात आले.

हे ही वाचा : 

सातारा : आ. शिवेंद्रराजेंसह ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

China LPG Gas Leak: चीनमधील रेस्टॉरंटमध्ये LPG गॅसचा स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू

Back to top button