पिंपरी : महापालिकेचे 470 कोटी  राज्य शासनाच्या तिजोरीत | पुढारी

पिंपरी : महापालिकेचे 470 कोटी  राज्य शासनाच्या तिजोरीत

मिलिंद कांबळे
पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राज्य शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम जमा केली जाते. महापालिकेने गेल्या 5 वर्षांत तब्बल 470 कोटी 34 लाख रुपये शासनाच्या तिजोरीत भरले आहेत. महापालिकेने ही रक्कम सुमारे सहा लाख मिळकतधारकांकडून म्हणजे शहरवासीयांकडून जमा केली आहे. शहरातील मिळकतधारकांकडून निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जागेवर दरवर्षी कोट्यवधींचा मिळकतकर गोळा केला जातो.
गेल्या सन 2022-23 या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत 816 कोटी रुपये जमा झाले होते. मिळकतकर बिलात सामान्य कर हा केवळ घर व मालमत्तेवरील कर आहे. उर्वरित इतर कर हे पाणीपुरवठा, आरोग्य, ड्रेनेज, उद्यान, स्थापत्य या विभागाचे तसेच, राज्य शासनाचे कर आहेत. रोजगार हमी कर, शिक्षण कर व फ्लोअरेज कर हे तीन कर राज्य शासनाचे आहेत. तो कर नागरिकांकडून वसूल करून शासनाकडे पाठविला जातो.
मिळकत करातून गेल्या वर्षी एकूण 816 कोटी रुपये जमा झाले होते. त्यापैकी रोजगार हमी कर 12 कोटी 88 लाख आहे. शिक्षण कर 129 कोटी 87 लाख आणि फ्लोअरेज कर 8 कोटी 52 लाख असे एकूण 151 कोटी 27 लाख रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले. सरासरी दरवर्षी 100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम महापालिका राज्य शासनाला
देत आहे.

मिळकतकरासोबत इतरही करांची वसुली

महापालिका दरवर्षी मिळकतकर वसूल करते. मिळकतकराच्या बिलात प्रशासकीय सेवाशुल्क, सामान्यकर, वृक्ष उपकर, मलप्रवाह सुविधा लाभकर, पाणीपुरवठा लाभकर, रस्ता कर, विशेष साफसफाई कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, फ्लोअरेज कर, जप्ती वॉरंट फी, मनपा कर विलंब दंड, शिक्षण कर विलंब दंड, रोजगार हमी कर विलंब दंड, फ्लोअरेज कर विलंब दंड, अवैध बांधकाम शास्ती, उपयोगकर्ता शुल्क असा विविध प्रकारचे 17 कर व दंडाचा समावेश आहे. हा कर महापालिका दरवर्षी वसूल करते. घर व आस्थापनेतून कचरा जमा केला जातो. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून दर महिन्यास घरटी 60 रुपये व इतरांकडून दरमहा 90 ते 150 रुपये उपयोगकर्ता शुल्क म्हणून जमा करण्यास सुरुवात केली आहे. ती एकूण वर्षभराची रक्कम मिळकतकर बिलात समाविष्ट केली आहे.

महापालिकेने राज्य शासनाकडे पाच वर्षात भरलेली रक्कम

कर                                 वर्षनिहाय रक्कम (कोटी रुपयांत)
                              2018-19    2019-20   2020-21    2021-22     2022-23
रोजगार हमी कर          7.77          8.36          7.7             9.79         12.88
शिक्षण कर                 58.50          69.3        62.16         76.36       129.87
फ्लोअरेज कर              2.72          4.82        6.00            6.49           8. 52
एकूण                        68.99       82.21       75.23            92.64       151.27
राज्य शासनाचे रोजगार हमी कर, शिक्षण कर व फ्लोअरेज कर आहेत. ते नागरिकांकडून जमा करून महापालिका दरवर्षी राज्य शासनाकडे जमा करते. ती रक्कम राज्य शासन नागरिकांच्या विकासकामावर खर्च करते.
-जितेंद्र कोळंबे, 
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका
हेही वाचा

Back to top button