पुण्यातील बिबवेवाडी परिसरात खोदाई थांबेना! | पुढारी

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात खोदाई थांबेना!

बिबवेवाडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू झाला असतानाही बिबवेवाडी परिसरात महापालिकेची खोदकामे अजूनही थांबली नाहीत. पापळवस्ती ते विद्यानिकेतन विद्यालयाच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी खोदकाम केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून चालावे लागत आहे.

या कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे परिसरात ये-जा करणारे विद्यार्थी, वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी उताराचा भाग असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या अधिकार्‍यांना याबाबत विचारले असता हे काम मुख्य खात्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून हे खोदकाम करण्यात येत आहे. याबाबत विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क केला असता या कामाबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

रहिवासी संतोष देवेंद्र म्हणाले की, बिबवेवाडीतील पापळवस्ती व विद्यानिकेतन शाळेजवळील भागात रस्ते खोदकाम सुरू असून, या ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पाणी साचल्याने परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.

महापालिका आयुक्तांनी गेल्या काळात रस्त्यावरील खोदकाम पूर्णपणे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला अधिकारी व ठेकेदारांनी केराची टोपली दाखवली असून, बिबवेवाडी परिसरात अजूनही रस्त्याचे खोदकाम सुरूच आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

– संतोष देवेंद्र, रहिवासी, बिबवेवाडी

हेही वाचा

पुणे : मुठा नदीपात्रात राडारोड्याचे ढीग; वारजे भागातील चित्र

नाशिक : जिल्हा सरकारी बँकेच्या निवडणुकीचे आज होणार चित्र स्पष्ट

सोलापूर : मंगळवेढा संकलन केंद्रावर दूध घोटाळा

Back to top button