पुणे : ‘त्या’ शिक्षकांना 16 हजार मानधन; पालकमंत्र्यांची बैठक

पुणे : ‘त्या’ शिक्षकांना 16 हजार मानधन; पालकमंत्र्यांची बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या रजा मुदतीवरील शिक्षकांचे मानधन सहा हजारांवरून 16 हजार रुपये करण्याचा आणि नगरविकास विभागाकडून अहवाल मिळताच या शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर रजा मुदतीच्या शिक्षकांनी चार दिवसांपासून केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.

महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून रजा मुदतीवर 93 शिक्षक काम करीत आहेत. या शिक्षकांना 6 हजार रुपये मानधन आहे. या सर्व शिक्षकांना कायम सेवेत घेऊन नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला फेब—ुवारीमध्ये दिले. तसेच, नगर विकास खात्याला 50 हजारांचा दंडही केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही पालिका प्रशासनाने या शिक्षकांना सेवेत सामावून घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी चार दिवसांपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यात शिक्षकांचे या महिन्यापासूनच मानधन 16 हजार रुपये करण्याचा निर्णय झाला. तसेच, पालकमंत्र्यांनी पुढील 15 दिवसांत शिक्षकांना कायम सेवेत घेण्याबाबत नगरविकास विभागाकडून सकारात्मक अहवाल आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संध्याकाळी उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे शिक्षक संघटनेचे सचिन डिंबळे यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाकडील सॉफ्टवेअर जुने असून, त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतनास उशीर होत आहे. पुढील महिन्यापर्यंत नवीन सॉफ्टवेअरचे काम पूर्ण होईल. येत्या दोन महिन्यांत महिन्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन होईल. शिक्षण मंडळाकडील रोजंदारी कर्मचार्‍यांना कायम करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.

– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news