सोलापूर : मंगळवेढा संकलन केंद्रावर दूध घोटाळा | पुढारी

सोलापूर : मंगळवेढा संकलन केंद्रावर दूध घोटाळा

सोलापूर; संदीप गायकवाड :  दूध संघाच्या मंगळवेढा येथील संकलन केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील एक कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून एका संस्थेचे दूध संकलन बोगस पद्धतीने वाढवून देत असल्याची बाब समोर आली आहे. ही संस्था एका संचालकाशी संबंधित असून या घोटाळ्यामुळे संघाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे.

जिल्हा सहकारी दूध संघाच्या मंगळवेढा येथील संकलन केंद्रावर मोठा गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. संघाचे संकलन वाढले असताना संघाला होत असलेल्या मोठ्या प्रमाणाच्या तोट्याबाबत प्रशासनाने तपासणी सुरू केली होती. त्यामध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. संबंधित कर्मचारी एका संचालकाच्या संबंधित असलेल्या दूध उत्पादक संस्थेचे दूध प्रतिदिन 100 ते 200 लिटर इतके बोगस पद्धतीने वाढवून देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा कर्मचारी गेल्या पाच वर्षांपासून तेथे नेमणुकीस असल्याची माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येते. या गैरव्यवहारातील नेमका आकडा अद्याप समोर आला नसला तरी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यामध्ये झाल्याचा दावा केला जात आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याला निलंबित केले आहे.

पैशाची वसुली होणार का?

मंगळवेढा येथील संकलन केंद्रावर झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे संघाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, मात्र राजकीय दबावापोटी या प्रकरणात किती कारवाई होणार, हा प्रश्नच आहे. यापूर्वीही इस्लामपूर येथील कालिका डेअरी प्रकरणात संघाला 45 लाख रुपयांचा फटका बसला आहे, मात्र तत्कालीन राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकरणातील एकही रुपया अद्यापपर्यंत प्रशासनाला वसूल करता आला नाही.

जानेवारीपासून दूध संघात ऑनलाईन प्रणाली चालू केली आहे. त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. जानेवारीपूर्वी किती दिवसांपासून हा घोटाळा सुरू होता, याबाबत अद्याप तरी माहिती उपलब्ध झाली नाही. संबंधित कर्मचार्‍याला निलंबित केले आहे. ज्या संस्थेला आर्थिक लाभ मिळवून दिला आहे, त्या संस्थेकडून ती रक्कम वसूल केली जाईल.
– राजीव सगरोळीकर, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ

Back to top button