हडपसर : ससाणेनगर रस्त्यावर कोंडीची डोकेदुखी; नागरिक, वाहनचालक त्रस्त | पुढारी

हडपसर : ससाणेनगर रस्त्यावर कोंडीची डोकेदुखी; नागरिक, वाहनचालक त्रस्त

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील ससाणेनगर रस्त्यावरील रासगे आळी, पांढरेमळा येथील वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याची झाली आहे. यामुळे या भागातील वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हडपसरवरून ससाणेनगर, काळेपडळ, सय्यदनगर, महंमदवाडी, उंड्री, होळकरवाडी, वडाचीवाडी या भागात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयासमोर पुण्यावरून येणारी वाहतूक, हडपसर वेशीकडून येणारी वाहतूक, वैभव थिएटरशेजारील रस्त्यावरून रामोशी आळीकडून येणारी वाहतूक, ससाणेनगरकडून येणारी वाहतूक, रासगे आळी आणि पांढरेमळा या भागातून येणारी वाहने ससाणेनगर रस्त्यावर येतात. वाहतुकीच्या तुलनेत रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

या रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने तो वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी या मार्गावर बहुतेक वेळा वाहतूक पोलिसही नसतात. त्यातच या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांत जाणार्‍या विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांनी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अंतर्गत रस्त्यांवर अडथळा…

  • ससाणेनगर ते सय्यदनगर रस्त्यावर पथारी व्यावसायिकांची अतिक्रमणे
  • ससाणेनगर ते हडपसर वाहतुकीसाठी अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी
  • रामोशीआळी अंतर्गत रस्ता निमुळता असल्याने रहदारीस अडथळा
  • काळेपडळहून येणारा मार्गाही अतिक्रमणांच्या विळख्यात

ससाणेनगर रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाने वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

– महेंद्र बनकर,
रहिवासी, ससाणेनगर

ससाणेनगर परिसरातील वाहतुकीचे नियमन नियमितपणे करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

– सुनील जाधव, पोलिस निरीक्षक,
वाहतूक शाखा, हडपसर

हेही वाचा

सोलापूर : पोषण आहारात व्हावा बेदाण्याचा समावेश : राजू शेट्टी

पंढरपूर : काळेंनी टिकवले अस्तित्व; पाटलांची रोखली प्रतिष्ठा

Back to top button